आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहिबाईंची बियाणे बँक:पद्मश्री राहीबाई  पोपेरे यांच्या पहिल्या बीज बँकेला जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली भेट

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गावरान आणि देशी बियाणे संवर्धन करणाऱ्या बीजमाता पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांच्या अकोले तालुक्यातील कोंभाळणे येथील "बीज बँके'ला जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी शुक्रवारी (3 जून) ला भेट दिली. यावेळी राहीबाई पोपेरे यांनी ज‍िल्हाध‍िकाऱ्यांना बीज बँक प्रकल्प व त्यांच्या एकूण कामकाजाव‍िषयी माह‍िती द‍िली. "राहीबाईंशी झालेला आस्थेवाईक संवाद कायमच स्मरणात राहील " अशी भावना जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी व्यक्त केली.

'बायफ' या संस्थेच्या माध्यमातून पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांच्या गावरान आणि देशी बियाणे संवर्धनाचे काम देशातील कानाकोपऱ्यात पोहचले आहे. या संस्थेच्या प्रयत्नाने व राज्य शासनाच्या मदतीने देशातील ग्रामीण भागातील पह‍िली बीज बँक कोंभाळणे (तालुका,अकोले, जिल्हा अहमदनगर) येथे उभारण्यात आली आहे. "बीज बँकेला एक द‍िवस आपण नक्कीच भेट देण्यास येऊ" असा शब्द अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी राहीबाई यांना दिला होता.

बीज बँकेला भेट देऊन त्यांनी तेथे सुरू असलेले उपक्रम समजावून घेतले. स्थानिक वाणांचे संवर्धन व वृद्धी यासंदर्भातील सुरू असलेल्या कामांची माहिती त्यांनी राहीबाई यांच्याकडून समजून घेतली. बीज बँकेत लावलेले फोटो व अवॉर्ड गॅलरी बघताना पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच इतर महत्वाच्या व्यक्तींसोबत असलेले फोटो बघून ज‍िल्हाध‍िकाऱ्यांनी राहीबाईंना व‍िचारणा केली की, " आपण यांच्यासोबत पुरस्कार घेतल्यानंतर संवाद साधला का ?" त्यावर राहीबाई यांनी पंतप्रधान व राष्ट्रपती यांच्यासोबत मराठीत झालेला संवाद व आठवणींना उजाळा दिला. यावेळी संगमनेरचे उपव‍िभागीय अध‍िकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, अकोलाचे तहसीलदार सतीश थेटे, मंडलाध‍िकारी बाबासाहेब दातखिळे, तलाठी खेमनर उपस्थित होते.

ग्रामीण भागातील वीज-रस्ते-पाणी

ग्रामीण भागातील प्रमुख समस्या वीज, रस्ते व पाणी यांच्यावर लक्ष घालण्याची विनंती राहीबाईंनी ज‍िल्हाध‍िकाऱ्यांना यावेळी केली. पोपेरेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा दुरुस्त करण्याचे काम 'अग्निपंख' या स्वयंसेवी संस्थेमार्फत सुरू आहे. काम पूर्ण झाल्यानंतर लोकार्पण सोहळ्यासाठी नक्की या असे निमंत्रणही राहीबाईंनी त्यांना दिले.

बातम्या आणखी आहेत...