आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुणदान:दहावीत उत्तीर्ण होण्यात यंदाही मुलीच पुढे ; 36 टक्के विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी

नगर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑनलाइन अभ्यास करून ऑफलाइन परीक्षा दिल्यानंतर शुक्रवारी दहावीचा ऑनलाइन निकाल जाहीर झाला. निकालात सूक्ष्म फरकाने का होईना मुलींनी बाजी मारली. मुली उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९७.८२ तर मुले उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९५.६४ टक्के आहे. नगर जिल्ह्यात परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी ९६.५८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकाल हाती येताच उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी एकमेकांना पेढे भरवून जल्लोष केला.

दोन वर्षे कोरोनामुळे शाळा बंदच होत्या, परीक्षेपूर्वी शेवटच्या टप्प्यात काही शाळा सुरू होऊन वर्ग भरले होते. परंतु, वर्षभर ऑनलाइन अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांनी मोठी मेहनत घेऊन ऑफलाईन झालेल्या परीक्षेत यश मिळवले. अहमदनगर जिल्ह्यात २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षांत ६९ हजार ५०५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ६८ हजार ९०१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ६६ हजार ५४९ विद्यार्थी पास झाले. विशेष म्हणजे मुलींचा टक्का वाढल्याचे दिसून आले.

पुणे विभागात तब्बल १३ हजार १३३ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांवर गुण मिळाले तर १२ हजार १८१ विद्यार्थ्यांना ४५ टक्के गुण मिळाले. अहमदनगर जिल्ह्यात परीक्षेसाठी बसलेल्या २९ हजार ७८३ पैकी २९ हजार १३६ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. तर ३९ हजार ११८ विद्यार्थ्यांपैकी ३७ हजार ४१३ उत्तीर्ण झाले.

जिल्ह्यात अकोले तालुक्याचा निकाल सर्वाधिक अकोले ९८.३६, जामखेड ९६.४४, कर्जत ९६.७१, कोपगाव ९५, नगर९७.२६, नेवासे ९६.०७ , पारनेर ९७.७६, पाथर्डी ९५.५३, राहाता ९६.१२, राहुरी ९५.६१, संगमनेर ९७.१३, शेवगाव ९७.०९, श्रीगोंदे ९७.२५, श्रीरामपूर ९५.०७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

जिल्ह्यात ३६ टक्के विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी जिल्ह्यात ६० टक्क्यांहून अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना श्रेणी एक मिळाली आहे. जिल्ह्यातील ६८ हजार ९०१ विद्यार्थ्यांपैकी २५ हजार २२ विद्यार्थी श्रेणी एकमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. तर दुसऱ्या श्रेणीत १६ टक्के तर तिसऱ्या श्रेणीत ११ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

पुनर्परीक्षार्थींचा (रिपिटर) निकाल ८० टक्के पुनरपरीक्षेसाठी (रिपिटर) बसलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल ८०.९१ टक्के लागला आहे. जिल्ह्यात पुनर्परीक्षेसाठी १ हजार ५४६ विद्यार्थी बसले होते, त्यापैकी १ हजार २५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात मुलींचे प्रमाण ८६ टक्के तर मुले पास होण्याचे प्रमाण ७८ टक्के आहे.

बातम्या आणखी आहेत...