आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ऐतिहासिक उत्सव:साईबाबांच्या हयातीत सुरू असलेला गोकुळाष्टमी उत्सव पुन्हा सुरू होणार

शिर्डी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • साईबाबा संस्थानाने घेतलेल्या निर्णयाचे ग्रामस्थांकडून स्वागत

साईबाबांच्या हयातीत सुरू असलेला व नंतर कालानंतराने बंद झालेला गोकुळाष्टमी उत्सव सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे. या निर्णय प्रक्रियेत सकारात्मक भूमिका बजावणारे साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांचा ग्रामस्थांनी सत्कार केला.

साई संस्थानच्या या निर्णयामुळे शिर्डीत गोकुळाष्टमीच्या रूपाने चौथा उत्सव सुरू होणार आहे़.साईबाबांच्या हयातीत रामनवमी, गुरुपौर्णिमा व गोकुळाष्टमी उत्सव साजरे करण्यात येत असे. बाबांच्या निर्वाणानंतर पुण्यतिथी उत्सवाची भर पडली. साईभक्त तात्या कोते यांच्याकडे रामनवमीबरोबर गोकुळाष्टमी उत्सवाची जबाबदारी होती. समाधीच्या काही वर्षांनंतर आठ दिवस चालणारा गोकुळाष्टमी उत्सव हळूहळू मागे पडला. शिर्डी गॅझेटियरच्या माध्यमातून हा विषय समोर आला. सोशल मीडियातही या विषयावर ग्रामस्थांबरोबर भाविकांनीही हा उत्सव पुन्हा सुरू होण्यासाठी आग्रह धरला. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी साई संस्थानला लेखी निवेदनाद्वारे हा उत्सव सुरू करण्याची मागणी केली होती. साई संस्थानने ग्रामस्थ व भाविकांच्या श्रद्धेचा आदर करत साईबाबांच्या काळात सुरू असलेला उत्सव सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ज्ञानेश्वर गोंदकर, तात्या कोतेंचे वंशज बाबासाहेब कोते, अभय शेळके, कमलाकर कोते, विजय जगताप, सुजित गोंदकर, नितीन कोते, प्रमोद गोंदकर यांनी आज सीईओ अरुण डोंगरे व डेप्युटी सीईओ रवींद्र ठाकरे यांची भेट घेऊन सत्कार केला.

या ऐतिहासिक निर्णयामुळे संस्थानच्या समितीचे सदस्य असलेले प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर, साई संस्थानचे सीईओ अरुण डोंगरे, नाशिकचे अपर महसूल विभागीय आयुक्त दिलीप स्वामी, नगरच्या सहायक धर्मादाय आयुक्त गीता प्रवीण बनकर यांची शिर्डीच्या इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद होईल अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत.

साईसच्चरित्र पारायण १५ दिवस वाढणार

गेल्या पंचवीस वर्षांपासून सुरू असलेला साईसच्चरित्र पारायण सोहळा श्रावणाच्या पहिल्या दिवशी सुरू होत असे.आता तो साधारण पंधरा दिवस पुढे गोकुळाष्टमीला जोडून घेण्यात येणार असल्याने पुर्वीचा गोकुळाष्टमी उत्सव पुनरुज्जीवित होणार आहे. साईसच्चरित्र पारायण सोहळा नवरात्रात येत असल्याने त्याचे आगळेवेगळे महत्त्व आहे. या उत्सवामुळे श्रावणात भाविकांचा ओघ वाढणार आहे. कोरोनामुळे यंदा हा उत्सव भाविकांशिवाय साध्या पद्धतीने साजरा होईल.