आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगरच्या नामांतराचा निर्णय घेताना नगरकरांचे मत विचारात घेणे आवश्यक आहे. नामांतराची नगरमधून मागणी झालेली नाही. जिल्ह्याबाहेरून कोणी मत व्यक्त केले म्हणून निर्णय घेतला, तर त्याचे पडसाद स्थानिक पातळीवर उमटतील, त्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय ठरवू नये, नगरकरांवर लादूही नये, अशा शब्दात भूमिका मांडत भाजप खासदार डॉ. सुजय विखे यांनी नामांतराला अप्रत्यक्ष विरोधही दर्शवला आहे.
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर व भाजपचे परभणी जिल्ह्यातील अध्यक्ष सुरेश भुमरे यांनी केलेल्या मागणीनुसार विधिमंडळाच्या अधिवेशनात शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मागणीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाईल, असे सांगितले. तसेच मनपानेही महासभेकडे पाठविण्यासाठी प्रस्ताव केला आहे. या पार्श्वभूमीवर खासदार विखे यांनी नगरमध्ये पत्रकारांशी बोलताना भूमिका मांडली. नगरच्या नामांतरामुळे जिल्ह्याचा दुष्काळ मिटणार की पाणी मिळणार, असा उपरोधिक सवालही त्यांनी उपस्थित केला.
खासदार विखे म्हणाले, नगरसेवक महापालिकेच्या सभेत मत व्यक्त करतील. शहराच्या लोकप्रतिनिधींचे मतही विचारात घेतले जावे. स्थानिक नागरीक जोपर्यंत काही मत व्यक्त करत नाही, तोपर्यंत राज्य सरकारने नामांतराची प्रक्रिया सुरू करू नये. नगरचे नामांतर हे एका पक्षाचे धोरण असू शकत नाही, असेही विखे यांनी स्पष्ट केले.
खासदार सुजय विखे यांचा आमदारांना टोला
खासदार विखे यांनी नगरच्या जिल्हा विभाजनाला विरोध केला. ज्यांच्याकडे ‘व्हिजन’ नाही, ते विभाजनाची मागणी करतात. राष्ट्रवादीच्या आमदाराने गेल्या अडीच वर्षात हा निर्णय का घेतला नाही? जिल्हा विभाजन केवळ ठराविक लोकप्रतिनिधींच्याच मनात आहे. जिल्हा विभाजनामुळे जिल्ह्याची एकत्रित ताकद कमी होईल. ज्यांना आमची अडचण वाटते, ते विभाजनाची मागणी करतात. ज्यांना राजकीय स्वायत्तता हवी, त्यातून मनमानी कारभार करता यावी, अशी इच्छा आहे, तेच मागणी करतात, असा टोला विखे यांनी लगावला.
अामदार संग्राम जगताप म्हणतात, विभाजन व्हावे
नगरच्या नामांतरास आमचा कुठलाही विरोध नाही. पण कोणते नाव द्यायचे, याची मतमतांतरे आहेत. कोणी आनंदनगर नाव द्या म्हणते, तर कोणी अंबिकानगर करा, अहिल्यादेवीनगर करा म्हणते. यावर चर्चा सुरू राहील. पण आमची पहिली मागणी आहे ती जिल्हा विभाजन करण्याची. त्यासाठी पुढाकार घेतला जावा व जिल्हा विभाजन पहिले केले जावे, अशी मागणी नगर शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.