आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात इन्फल्यूएंझा ए एच १ एन १ (स्वाइन फ्ल्यू) रुग्णांमध्ये वाढ होत आहे. जानेवारी ते २० जुलै या काळात राज्यात ८१ बाधित रुग्ण आढळले. तर ४ रुग्णांचा मृत्यू झाला. स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण पावसाळ्यात प्रामुख्याने आढळतात. या वर्षी पावसाळ्यात हे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करत राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने विशेष उपाययोजना तातडीने कराव्यात, असे आदेश जिल्हा आरोग्य प्रशासन व महापालिकेला दिले आहेत. प्रत्येक फ्ल्यू सदृश्य रुग्णांची कोविड सोबतच इन्फल्यूएंझा तपासणी देखील करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यात कोरोना नियंत्रणात असला, तरी मागील काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यांमध्ये व नगर शहर व जिल्ह्यातही रुग्णांचे प्रमाण काही प्रमाणात का होईना वाढत असल्याचे चित्र आहे. अशातच आता राज्य शासनाने स्वाइन फ्लूच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. औषधोपचार व तपासणीबाबतही शासनाने जिल्हा प्रशासन व महापालिकेला मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. कोविडप्रमाणेच स्वाइन फ्ल्यू रुग्णांबाबतचा अहवाल दररोज पाठविण्याचे निर्देशही सहसंचालक स्वप्नील लाळे यांनी दिले आहेत. ,
बाधितांच्या सहवासातील व्यक्तींचा शोध घ्या
स्वाइन बाधित रुग्णांच्या सहवासातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यापैकी फ्ल्यू सदृश्य लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना उपचार द्यावेत. लक्षणे आढळून येण्याच्या एक दिवस आधीपासून ते लक्षणे आढळल्यानंतर ७ दिवसांपर्यंत इन्फ्ल्युएंझा ए एच १ एन १ चा रुग्ण सहवासात असणाऱ्या व्यक्तींना संसर्ग संक्रमित करु शकतो. त्यामुळे या कालावधीत बाधित रुग्णांच्या सहवासात आलेल्यांचा शोध घेणे आवश्यक आहे, असे शासनाने स्पष्ट केले आहे.
फ्ल्यू सदृश्य रुग्णांचे सर्वेक्षण करा
जिल्ह्यात फ्ल्यू सदृश्य रुग्णांच्या सर्वेक्षणाची जबाबदारी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या नियंत्रणाखालील यंत्रणेवर सोपविण्यात आली आहे. सौम्य फ्ल्यू रुग्णावर लक्षणानुसार उपचार करणे व त्यांच्या निकट सहवासितांचा शोध, उपचार उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सर्व आरोग्य संस्थामध्ये सर्वेक्षणाचे काम नियमित करावे. सर्वेक्षणात फ्ल्यू सदृश्य रुग्णांच्या सर्वेक्षणासह तीव्र श्वसनदाह असलेल्या रुग्णांचे सर्वेक्षणही करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
विलागीकरण कक्षाची स्थापना करा
स्वाइन उपचारासाठी निवडण्यात रुग्णालयात विलगीकरण कक्ष स्थापन करावेत. कक्षात २ खाटांमध्ये ६ फुटाचे अंतर असावे. कक्षातील वायुविजन व्यवस्थित असावे, कक्षास एक्झॉस्ट फॅन असावा, कक्षातील ऑक्सीजन सिलींडर, पल्सॉक्सी मीटर, सक्शन मशीन, इमर्जन्सी ट्रे, व्हेन्टीलेटर्स आदी उपकरणे, प्रशिक्षित स्टाफ व यंत्रणा असाव्यात, कक्षामध्ये जंतुप्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असेही शासनाने आदेशात म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.