आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट:हायप्रोफाईल प्रोफेसर कॉलनी चौक ठरतोय दुर्गंधीचा हॉटस्पॉट ; साफसफाईकडे मनपाचे दुर्लक्ष

मयूर मेहता | नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या कचरा संकलन करणाऱ्या गाड्यांचे प्रोफेसर कॉलनी चौकातील पार्किंग परिसरातील नागरिकांसाठी अक्षरशः डोकेदुखी ठरले आहे. रात्रीच्या वेळी कचरा भरलेल्या गाड्या तशाच पार्किंगमध्ये उभ्या केल्या जातात. कचरा ने-आण करणाऱ्या गाड्यांमधील कचरा रस्त्यावर पडून तो कुजलेला असल्याने संपूर्ण परिसरात दुर्गंधी सुटली आहे. महापालिकेकडून साफसफाईकडे दुर्लक्ष होत असल्याने हायप्रोफाईल समजला जाणारा प्रोफेसर कॉलनी चौक दुर्गंधीचा हॉटस्पॉट ठरत आहे.

शहरात खाजगी संस्थेमार्फत कचरा संकलन व वाहतुकीचे काम केले जाते. त्यासाठी कार्यरत असलेल्या घंटागाड्या व कॉम्पॅक्टर प्रोफेसर कॉलनी चौकातील महापालिकेने ठेकेदाराला दिलेल्या जागेत लावलेल्या असतात. रात्रीच्या वेळी कचरा भरलेल्या गाड्याही तशाच रात्रभर उभ्या केल्या जातात. त्यामुळे संपूर्ण दुर्गंधी सुटते. कचरा संकलन करणारी वाहने कचरा घेऊन येताना त्यावर ताडपत्री न टाकता तशाच आणत असल्याने संपूर्ण रस्त्यावर कचरा पडलेला असतो. प्रोफेसर कॉलनी चौक ते प्रेमदान चौक या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला असून तो कुजला आहे. त्यामुळे दिवसभर या रस्त्यावर ये जा करणाऱ्या नागरिकांना, परिसरातील रहिवासी व गाळेधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

पार्किंग इतरत्र हलवण्याची मागणी
प्रोफेसर कॉलनी चौकात नागरिकांची कायम वर्दळ असते. उपनगर परिसरातील सर्वात रहदारीचा व मोठे व्यावसायिक केंद्र निर्माण झालेला हा भाग आहे. या परिसरात कचरा गाड्यांचे पार्किंग असल्याने व तेथेच एका गाडीतून दुसऱ्या गाडीत कचरा भरला जात असल्याने दिवसभर दुर्गंधी सुटलेली असते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मनपाने हे पार्किंग इतरत्र हलवावे.
रोहित सरोदे, नागरिक.

घंटागाडीतून कॉम्पॅक्टरमध्ये टाकला जातो कचरा
प्रोफेसर कॉलनी व्यापारी संकुल लगत व नाट्यगृहाचे काम सुरू असलेल्या जागेशेजारी कचऱ्याची वाहने लावण्यासाठी ही जागा वापरली जात होती. या परिसरात मोठी रहिवासी वसाहत आहे. तसेच व्यावसायिक गाळे, कॉम्प्लेक्सही मोठ्या प्रमाणात आहेत. असे असतानाही या ठिकाणी आता दिवसभर कचरा गाड्यांची वर्दळ असते. घंटागाडीतून कॉम्पॅक्टरमध्ये कचरा भरण्याचे कामही याच ठिकाणी केले जात असल्याने या जागेला कचरा डेपोचे स्वरूप आले आहे.

कोट्यावधी रुपये खर्चूनही रस्त्यावर कचराच
शहरातील रस्त्यांवर साफसफाई, घरातील कचरा संकलन या कामांवर दरवर्षी १० कोटींहून अधिक खर्च केला जातो. साफसफाईसाठी मनपाकडे सुमारे ६०० ते ७०० कर्मचारी उपलब्ध आहेत. असे असतानाही उपनगर भागातील मोठी वसाहत असलेल्या व सर्वात मोठे व्यावसायिक केंद्र असलेल्या भागात दररोज साफसफाई होत नाही. दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्चूनही दररोज रस्त्यांची साफसफाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...