आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आनंद नावाने पुन्हा दुमदुमला:आनंदधामची पवित्र भूमी श्रमण संघाचे केंद्र बनलीय, पुण्यस्मृतीदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात आदर्शऋषिजी महाराज यांचे प्रतिपादन

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन वर्षानंतर आनंदधाम परिसर आनंद नावाने पुन्हा दुमदुमला आहे. याचा आनंद वेगळा आहे. आनंदधाम ही गुरुदेवांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. ही गुरुदेवांची कर्मभूमी, श्रध्दाभूमी, साधनाभूमी, तीर्थभूमी व निर्वाणभूमी आहे. गुरुदेवांना स्थिरावास करण्यासाठी मुंबई, पुणे आदी क्षेत्रांची विनंती होती. परंतु गुरुदेवांनी नगरलाच स्थिरावास करण्याचे ठरवले. आनंदधाम येथे गेल्या तीस वर्षापासून रचनात्मक उपक्रम चालू असल्याने ही भूमी श्रमण संघाचे केंद्र बनली आहे, असे प्रतिपादन प्रबुध्द विचारक आदर्शऋषिजी महाराज यांनी केले. राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांचा ३० वा पुण्यस्मृतीदिन नुकताच आनंदधामच्या पवित्र पावन भूमीत विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा झाला. पुण्यस्मृतीदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

आदर्शऋषिजी महाराज म्हणाले, गुरुदेवांचे दादागुरु त्रिलोकऋषिजी यांनी महाराष्ट्रात पदार्पण करून महाराष्ट्राच्या जैन समाजावर मोठे उपकार केले. त्यांचे निर्वाण याच अहमदनगर शहरात झाले. त्यांच्यावर गुरुदेवांची अगाध श्रध्दा होती. नगरच्या भूमीत वास्तव्य करून गुरुदेवांनी दहा वर्षे अखंड साधना केली. या भूमीवर गुरुदेवांचे दर्शन घेण्यासाठी जैन अजैन धर्माचे अनेक आचार्य, साधूसंतांचे आगमन झाले. संतोष बोथरा म्हणाले, आनंदऋषीजी हॉस्पिटलची संपूर्ण टिम करोना काळातही पूर्णवेळ कार्यरत होती. दोन वर्षात सीटीस्कॅन, आयसीयुची क्षमता वाढवण्यात आली. ऑक्सिजन प्लांट तयार केला. लिक्विड ऑक्सिजन टँक घेतला आहे. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, कार्डियाक सेंटर अद्ययावत केले. रूफ टॉप सोलरची व्यवस्था केली. तसेच आनंदऋषीजी नेत्रालयात चार वर्षात ५० हजारांहून अधिक नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आल्या. सध्या १५ व्हिजन सेंटरही कार्यान्वीत असून पुढील वर्षी ते ३० पर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे.

यावेळी आनंद ही आनंद ही डॉक्युमेंटरी फिल्मही दाखवण्यात आली. श्रावक संघाचे अध्यक्ष हस्तीमल मुनोत यांनी स्वागत केले. गुरुदेवांच्या ध्वनीमुद्रित मंगलपाठाने कार्यक्रमाची सांगता झाली.

बातम्या आणखी आहेत...