आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहामार्गांच्या दुरुस्तीसाठी राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी सुरू केलेले उपोषण गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशीही सुरूच होते. राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याशी लंके यांची भ्रमणध्वनी वरून चर्चा झाली असून, जोपर्यंत काम सुरू होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे लंके यांनी सांगितले. दरम्यान लंके यांच्या तपासणीसाठी आलेल्या वैद्यकीय पथकाला देखील उपोषणकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. वैद्यकीय पथक विलंबनाने आल्यामुळे कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.
अहमदनगर -पाथर्डी -नांदेड निर्मळ, अहमदनगर- राहुरी-कोल्हार-शिर्डी- कोपरगाव, नगर- मिरजगाव -चापडगाव- करमाळा -भुणी, नगर- पाथर्डी- शेवगाव या राष्ट्रीय महामार्गांची दुरुस्ती तातडीने करावी या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी बुधवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. गुरुवारी दुसऱ्या दिवशीही लंके यांचे उपोषण सुरूच होते. लंके यांच्या वैद्यकीय तपासण्यासाठी पथक उपोषण स्थळी दाखल झाल्यानंतर उपोषणकर्त्यांनी प्रशासकीय यंत्रणेवर आक्षेप घेऊन विलंबनाने हे पथक का आले याबद्दल जाब विचारला.
उपोषण मोडीत काढण्याचा प्रयत्न : आमदार लंके
उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे. जबाबदार अधिकारी अद्यापपर्यंत येत नाही. ज्यांना अधिकार नाही ते येत आहेत. उपोषणकर्त्यापैकी हरिहर गर्जे यांची रात्री प्रकृती बिघडली होती. त्यांना खाजगी मेडिकलमधून औषधे आणून दिली. प्रशासनाकडून उपोषण मोडून काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. अजित पवार यांच्याशी चर्चा झाली आहे. आम्ही कोविडच्या कालावधीत काम केले. हे वैयक्तिक राजकारण नाही तर विकासाचे राजकारण आहे. लोकांनी संधी मला दिली, त्यामुळे मी काम करणार आहे. मी फकीर माणूस आहे. असे निलेश लंके यांनी सांगितले.
लंके यांची प्रकृती स्थिर
आमदार निलेश लंके व अन्य उपोषणकर्त्यांच्या वैद्यकीय तपासणीत हृदयाचे ठोके, रक्तातील साखर चाचण्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर आहे. असे जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम पानसंबळ यांनी सांगितले. दरम्यान आम्हाला पत्र मिळाल्यानंतर अर्ध्या तासात आम्ही पथकासह उपोषण स्थळी दाखल झालो होतो. शिवाय कुणाचा दबाव वगैरे असण्याचा प्रश्नच नाही असे डॉ. पानसंबळ यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.