आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शिर्डी येथून बेपत्ता झालेल्या इंदूरमधील साईभक्त मनोज सोनी यांच्या पत्नी दीप्ती या तीन वर्षे चार महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर इंदूरमध्येच सापडल्या आहेत. साईनगरीतून मानवी तस्करी होत असल्याची शंका व्यक्त करत पोलिसांच्या तपासाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करून मनोज यांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, आता या प्रकरणास आणखी काही कलाटणी मिळते का, की अन्य काही प्रकार उघडकीस येतात याची उकल पोलिसांच्या सविस्तर चौकशीनंतरच होईल. दरम्यान, शिर्डी पोलिसांनी तक्रारदार मनोज, दीप्ती व त्यांची बहीण कीर्ती सोनी यांना पुढील कार्यवाहीसाठी शिर्डीत आणले आहे.
मनोज हे पत्नी दीप्ती व कुटुंबीयांसह १० ऑगस्ट २०१७ रोजी शिर्डीत आले होते. दीप्ती दुकानात गेल्यानंतर गायब झाल्या होत्या. तपासानंतरही त्या सापडत नसल्याने मनोज यांनी पोलिसांत तक्रार दिली. मनोज यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. न्यायालयाने शिर्डी पोलिस व नगर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी केलेल्या तपासाबाबत नाराजी व्यक्त करत ताशेरे ओढले तसेच मानवी तस्करी अथवा अवयव चोरीचे रॅकेट कार्यरत आहे का या दृष्टीने तपासाचे निर्देश राज्याचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांना दिले. एकीकडे न्यायालयाच्या आदेशानुसार तपासाची चक्रे वेगाने फिरत असताना अचानक दीप्ती गुरुवारी, १७ डिसेंबर २०२० रोजी इंदूरला बहिणीच्या घरी परतल्या. ३ वर्षांपासून इंदूरमध्येच राहत होत्या आणि मनोज यांच्या सासऱ्यांना त्या सापडल्या, अशी माहिती मनोज यांचे वकील सुशांत दीक्षित यांनी दिली.
आज कोर्टासमोर करणार हजर
दीप्ती यांना शनिवारी (दि.१९) उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार औरंगाबाद येथील मुख्य न्यायदंडाधिकारी मंगला मोटे यांच्यासमोर हजर करण्यात आले. त्यांनी त्यांना औरंगाबाद येथील महिला सुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले असून सोमवारी उच्च न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
पोलिस तपासात होईल उकल
तीन वर्षांच्या कालावधीत दीप्ती या इंदूरमध्येच असताना त्यांनी आपल्या कुटुंबीयांना संपर्क का केला नाही किंवा त्या नेमक्या कोठे होत्या या रहस्याची उकल आता पोलिस तपासातच होईल. दरम्यान, शिर्डीत मानवी अवयवांची तस्करी होते याबाबतचे वृत्त देशभरात पसरल्याने एकच खळबळ उडाली होती.
पतीने मानवी तस्करीचा संशय घेतल्यानंतर न्यायालयाकडूनही ताशेरे
महिलेचा जबाब; मंदिराबाहेर चक्कर येऊन पडले होते
मनोज यांनी म्हटले आहे की, मी बडोद्यात ड्यूटीवर असताना मला सासऱ्यांनी ही माहिती दिली. दीप्तीस तीन वर्षांचा कालावधी तसेच बेपत्ता होण्यासंदर्भात विचारणा केली असता तिने सांगितले की, साई मंदिराबाहेर दुकानात गेल्यानंतर मी चक्कर येऊन पडले व मला पुढचे काहीच आठवत नाही. एका वृद्ध महिलेसह मी इंदूरमध्येच राहत होते. पण शिर्डीतून परत आले हे सांगता येत नाही.
कुटुंबासाठी मोठा दिलासा : मनोज म्हणाले, ती परत आली हाच आमच्यासाठी मोठा दिलासा आहे. मागील साडेतीन वर्षे आमच्या कुटुंबासाठी अतिशय कठीण होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.