आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:कोल्हे गटाने अगोदर कोपरगाव शहरवासियांची माफी मागावी; कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी दिले आव्हान

कोपरगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

२०१९ पूर्वी देखील सर्व प्रकारची सत्तास्थाने ताब्यात असल्यामुळे कोल्हे गटाने २०१९ पर्यंत ५ नंबर साठवण तलाव होऊ दिला नाही. ५ नंबर साठवण तलाव होऊ नये, यासाठी पडद्यामागून कोल्हेंनी काय प्रयत्न केले, हे शहरातील जनतेला माहीत आहे आणि २८ विकास कामांना कोण न्यायालयात घेऊन गेले, हे देखील जनतेने पाहिले आहे. मात्र, पुन्हा एकदा आपला पडद्यामागून विरोध करण्याचा डाव फसल्यामुळे कोल्हेंना झालेल्या मनस्तापापायी अब्रूनुकसानीची भाषा कोल्हे गट करीत आहे. मात्र, त्यापूर्वी त्यांनी आजपर्यंत शहरविकासाला विरोध केल्याबद्दल अगोदर कोपरगाव शहरातील जनतेची माफी मागितली पाहिजे, असे आव्हान कोल्हे गटाचे पराग संधान यांनी केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी केले.

कोल्हे गटाने आपल्या धारणगाव, ब्राम्हणगाव गावातील कार्यकर्त्याकरवी न्यायालयात ५ नंबर साठवण तलाव, प्रसिद्ध झालेली निविदा व मंजूर करण्यात आलेले वाढीव पाणी आरक्षण स्थगित करावे, अशा आशयाची याचिका औरंगाबाद खंडपीठाने नुकतीच फेटाळली. त्यामुळे एकप्रकारे ५ नंबर साठवण तलावालाच विरोध करण्याचा कोल्हेंचा डाव फसला. ५ नंबर साठवण तलावामुळे कोपरगाव शहराची तहान कायमची भागणार आहे याची जाण असलेल्या श्रीसाईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ५ नंबर साठवण तलावासाठी किती संघर्ष केला, हे कोपरगावकरांनी पाहिले. त्यांनी शहरातील जनतेला दिलेला शब्द पूर्ण करून आपले राजकीय वजन वापरत ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १३१.२४ कोटी रुपये निधी मिळवला.

त्यासाठी वाढीव पाणी देखील त्यांनी मंजूर करून घेतले. त्यामुळे शहरातील जनतेने हे सर्व श्रेय आमदार आशुतोष काळे यांना दिले. कारण ज्यावेळी आमदार काळे ५ नंबर साठवण तलाव व्हावा, यासाठी संघर्ष करीत होते. त्यावेळी शहरातील जनता त्यांच्या सोबत होती व या संघर्षाचे शहरातील नागरिक साक्षीदार आहेत. त्यामुळे आपण कुठे तरी बाजूला पडलो आहोत, हे कोल्हे गटाला स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळे त्यांना पत्रकार परिषद घेऊन सारवासारव करावी लागत असल्याचे सुनील गंगुले यांनी म्हटले.

सर्व प्रकारची सत्ता असताना माजी आमदार कोल्हेनी ५ नंबर साठवण तलाव होऊ नये यासाठी समृद्धीच्या ठेकेदारावर राजकीय वजन वापरून दबाव कोणी आणला होता? आजपर्यंत शहर विकासाला कोणी खोडा घातला होता, हे कोपरगावची जनता जाणून आहे. आमदार आशुतोष काळे यांनी निवडून येताच तीनच महिन्यांत ५ नंबर साठवण तलावाचे खाेदाईचे काम सुरू केले, असे गंगुले म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...