आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:महापौर; नगरसेवकांना अपात्र ठरवण्याची मागणी

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेने स्मशानभूमी व दफनभूमीसाठी खासगी जागा घेण्याबाबत केलेला ठराव विखंडित करावा. तसेच हा बेकायदेशीर ठराव करणाऱ्या महापौर रोहिणी शेंडगे यांच्यासह या प्रकरणाशी संबंधित सर्व नगरसेवकांना महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार नगरसेवक पदावर राहण्यास अपात्र ठरवावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी नगरविकास विभागाकडे केली आहे. प्रधान सचिवांकडे त्यांनी याबाबत तक्रार करतानाच आरक्षित जागा व त्यासाठी रस्त्याच्या क्षेत्राचे सक्तीने भूसंपादन करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

प्रस्तावित दफनभूमीच्या जागेचे मालक शिवाजी कराळे असताना नगरसेविका आशा कराळे यांच्याशी महापौर शेंडगे यांनी पत्रव्यवहार करण्याचा उद्देश काय? मनपा अधिनियमातील तरतुदीनुसार मनपा सदस्य असलेल्या व्यक्तीस मनपाबरोबर कोणत्याही जमिनीच्या पट्ट्यात, विक्रीत, अदलाबदली किंवा खरेदी यासारखे व्यवहार करता येत नाहीत. केल्यास या तरतुदीनुसार संबंधित पालिका सदस्य होण्यास अनर्ह ठरतील, अशीही तरतूद आहे. महापौर शेंडगे यांनी स्थायी समितीची पूर्वमान्यता नसतानाही स्वत:च्या पदाचा व अधिकाराचा दुरुपयोग केल्याने, ही कृतीही अधिनियमानुसार पालिका सदस्य म्हणून अनर्ह ठरवणारी असल्याचा दावा शेख यांनी केला आहे.

मनपा आयुक्तांनी राजकीय दबावाला बळी पडून वस्तुस्थिती निदर्शनास न आणता खासगी जागा विकत घेण्याचा प्रस्ताव सादर करणे गैर आहे. आरक्षण क्रमांक ५८ व ५८ ची जागा जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवून संपादित करण्याची कार्यवाही करणे आवश्यक आहे. प्रस्तावित नवीन जागा सीना नदी पूर नियंत्रण रेषेत बाधित होत असल्याने त्याचा इतर कारणासाठी वापर शक्य नसल्याने ती अधिकारी, पदाधिकारी, नगरसेवक यांच्याशी संगममत करुन ३२ कोटी रुपयांना विकत देण्याचा ठराव केल्याचा आरोप शेख यांनी केला आहे.

संगनमताची सखोल चौकशी करावी
मनपाचे पदाधिकारी व अधिकारी तसेच नगरसेवक यांनी संगनमत करुन हा प्रकार केलेला आहे. मनपाच्या आर्थिक हिताच्या विरोधात निर्णय घेऊन बेकायदेशीरपणे मंजूर केलेला ठराव विखंडित करण्यात यावा. या प्रकरणी महापौर, आयुक्त, नगररचना विभागाचे अधिकारी, संबंधित नगरसेवक यांची चौकशी होऊन त्यांच्याविरोधात अधिनियमातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही शेख यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...