आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापारनेर मधील दोन सख्ख्या भावांची राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) एकाच वेळी, एकाच तुकडीत निवड झाली. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत अशा प्रकारे सख्ख्या भावांची एकाच वेळी निवड होण्याची ही पहिलीच वेळ असावी. भारतीय सैन्य दलात सुभेदार पदावर कार्यरत असणाऱ्या भास्कर गायकवाड यांच्या प्रकाश व प्रसाद या अनुक्रमे १९ व १७ वर्षे वय असलेल्या सख्ख्या भावांनी हे यश मिळवले आहे. एनडीएतील १४८ व्या तुकडीच्या निवडीसाठी कोरोना संसर्गकाळात तणावपूर्ण वातावरणात प्रवेश परीक्षा झाली होती. सैन्य दलात कार्यरत असलेल्या वडिलांच्या सततच्या बदल्यांमुळे प्रकाश व प्रसाद यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण देशाच्या विविध राज्यात झाले. प्रकाश व प्रसादचे प्राथमिक शिक्षण अंबाला (हरियाणा), पारनेर (महाराष्ट्र), ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) येथे झाले. त्यानंतर प्रसादची सातारा येथील सैनिक स्कूल मध्ये निवड झाली. प्रकाशने मात्र सिलिगुडी (पश्चिम बंगाल), मथुरा (उत्तर प्रदेश) येथे उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. प्रत्येकी दोन वर्षांनी प्रांत, अध्यापनाची पध्दती बदलत असूनही प्रकाश आणि प्रसादने प्रत्येक ठिकाणी गुणवत्तेची चुणूक दाखवून दिली. १२ वी नंतर प्रकाशने नांदेड येथील अभियांत्रिकी महाविद्यालय प्रवेश घेतला. मात्र अकरावी पासून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रवेश मिळवण्याचा ध्यास घेतलेल्या प्रकाशने प्रवेश परिक्षेची तयारी सुरूच ठेवली होती. तर प्रसादची सैनिक स्कूलमध्ये प्रवेश परिक्षेची तयारी सुरू होती.प्रकाश व प्रसादाच्या मेहनतीला अखेर यश आले आणि दोन सख्ख्या भावांची एकाच वेळी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत,१४८ व्या तुकडीत निवड झाली. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून सैन्यदलात अधिकारी पदावर काम करण्याचा प्रकाशचा निर्धार होता. एनडीएमध्ये निवड झाली नसती तरी आपण सैन्यदलात अधिकारी पदावर भरतीसाठी असणाऱ्या प्रवेश परीक्षा देऊन भरती झालो असतोच असा विश्वास प्रकाशने व्यक्त केला.तर दुर्देवाने निवड झाली नसती तर आपण आयआयटी नंतर पहिल्याच प्रयत्नात केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रशासकीय सेवेत दाखल झालो असतो, असे १७ वर्षीय प्रसादने आत्मविश्वासाने सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.