आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी आयुक्त थेट शेतकऱ्यांच्या दारी:समस्या वरिष्ठ पातळीवरून सोडवण्यात येतील, अडचणींचा घेतला आढावा

अहमदनगर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकर्‍यांनी पिकवलेल्या सर्व पिकांना हमीभाव मिळावा तसेच वाटाणा, फुलशेती या पिकांना पीकविम्यात समाविष्ट करावे, पाणंद रस्ते-शिव रस्ते व शिवार रस्ते हे खुले करून द्यावेत, अशी आग्रही मागणी बहिरोबावाडी (ता. पारनेर) येथील शेतकऱ्यांनी राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांच्यासमोर केली.

यावेळी कृषी आयुक्तांनी संबंधित अधिकार्‍यांना सूचना देत शेतकर्‍यांच्या अडचणी सोडवण्याचे आदेश दिले. गावपातळीवर जर समस्येचे निरसन झाले नाही, तर वरच्या स्तरावरून त्या समस्या सोडवल्या जातील, असे आश्वासन कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी शेतकऱ्यांना दिले.

एक दिवस माझ्या बळीराजाचा

शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजा'साठी हा उपक्रम राज्यभर राबवण्यात येत आहे. राज्याचे कृषी आयुक्त धिरजकुमार यांनी बहिरोबावाडीतील श्रीबहिरोबा मंदिरात ग्रामसभा घेतली. यावेळी त्यांनी शेतकर्‍यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. ग्रामस्थ व शेतकर्‍यांनी त्यांना अडचणी सांगितल्या. शेतकर्‍यांनी पिकवलेल्या सर्व पिकांना हमीभाव मिळावा, अशी आग्रही मागणी यावेळी शेतकऱ्यांनी कृषी आयुक्तांकडे केली.

या आहेत मागण्या

तसेच वाटाणा, फूलशेती या पिकांना पीकविम्यात समाविष्ट करावे, ठिंबक सिंचनच्या धर्तीवर शेततळे प्लास्टीक अस्तरीकरणासाठी अनुदान मिळावे (7 वर्षानंतर), पाणंद रस्ते, शिव रस्ते व शिवार रस्ते हे खुले करून द्यावेत. महाडिबीटी योजनेची कागदपत्रे अपलोड करण्याचा कालावधी 10 वरून 30 दिवस करावा, दिवसा वीजपुरवठा करण्यात यावा, उत्पन्नवाढीसाठी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करावे, दुधाला एकसमान दर, बचत गटाच्या माध्यमातून छोट्या-मोठ्या उद्योगांना चालना द्यावी, आदी मागण्या शेतकर्‍यांनी केल्या.

कृषी आयुक्तांचा अनुभव

शेतकर्‍यांच्या वतीने शेतकरी सीताराम देठे यंनी सर्व अडचणी सोडवण्याबाबत साकडे घातले. यावर कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याचे आदेश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. गाव पातळीवर न सुटलेल्या समस्या वरिष्ठ पातळीवर सोडवण्यात येतील, असे आश्वासन दिले. यावेळी धीरज कुमार यांनी वस्तीवरील शेतकर्‍यांसमवेत भोजन घेतले. ग्रामीण भागात रात्री वीज नसल्यानंतर नागरिक अंधारात कसे राहत असतील, शेतकर्‍यांना किती अनंत अडचणींना सामोरे जावे लागते, याचा प्रत्यक्ष अनुभवच कृषी आयुक्तांनी घेतला.

या अधिकाऱ्यांची उपस्थिती

यावेळी विभागीय कृषी सहसंचालक रफिक नाईकवाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, उपविभागीय कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांनीही शेतकर्‍यांशी संवाद साधला. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी शंकर किरवे, तालुका कृषी अधिकारी विलास गायकवाड, मंडळ कृषी अधिकारी अरुण साठे, शेतकरी सीताराम देठे, बाबासाहेब व्यवहारे, उपसरपंच हरिराम खोडदे, अनिल देठे, विठ्ठल देठे, आदिनाथ व्यवहारे, ज्ञानेश्‍वर डुकरे, कृषी सहायक माधुरी बोरुडे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...