आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका:सातव्या वेतन आयोगाचा प्रश्न पेटणार ; कर्मचाऱ्यांच्या सामुहिक राजीनाम्यासाठी हालचाली

नगर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी कामगार युनियनने केलेल्या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेतली नाही. आंदोलन स्थगित करण्यासाठी थातूरमातूर आश्वासन दिले गेले. युनियननेही धरणे आंदोलन स्थगित केले. यातून कर्मचाऱ्यांची दिशाभूल झाल्याचा आरोप करत कर्मचारी आक्रमक झाल्याचे चित्र आहे. काही कर्मचाऱ्यांनी युनियनच्या सभासदत्वाचा सामुहिक राजीनामा देण्यासाठी सह्यांची मोहीम सुरू केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. वेतन आयोग लागू करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी जून अखेरची मुदत युनियनला दिल्याची माहिती समोर आली आहे. कर्मचाऱ्यांनी युनियनला सामूहिक राजीनाम्याचा इशारा देण्यासाठी युनियन अध्यक्षांच्या नावे पत्र तयार केले आहे. त्यावर सह्यांची मोहीम सध्या सुरू असल्याचे समजते. सातव्या वेतन आयोगासाठी युनियनने धरणे आंदोलन सुरु केलेले होते. त्याची प्रशासनाकडून कुठलीही ठोस दखल घेण्यात आलेली नाही. फक्त आंदोलन स्थगित करण्यासाठी थातुरमातुर आश्वासन देण्यात येऊन माघार घ्यायला भाग पाडले. युनियनने धरणे आंदोलन स्थगित केले. हा सर्व प्रकार कर्मचाऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचे यावरुन स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे आम्ही सर्व कर्मचारी आपल्या दिशाभूल करण्याच्या कामास कंटाळून युनियनच्या सदस्य पदाचा सामुहिक राजीनामा देण्याच्या मानसिकतेत आहोत. जून २०२२ अखेर सातवा वेतन आयोग लागू करावा. अन्यथा आम्हाला युनियनच्या सदस्य पदाचा सामुहिक राजीनामा द्यावा लागेल, असा इशारा या पत्रात देण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर मनपात सातवा वेतन आयोगाचा प्रश्न पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. या सर्व परिस्थितीत कामगार युनियन आता काय पवित्रा घेणार, याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

आता बेमुदत आंदोलन छेडणार ^ सातव्या वेतन आयोगाच्या प्रश्नासंदर्भात आमचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. शासन स्तरावर हा प्रश्न प्रलंबित आहे. यासंदर्भात मंत्र्यांची वेळ घेऊन भेट घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सदरचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी युनियन येत्या काळात बेमुदत आंदोलन छेडणार आहे. कर्मचाऱ्यांमध्ये काहीजण जाणीवपूर्वक दिशाभूल करत आहेत. मात्र, युनियनचा पाठपुरावा सुरू असून दिशाभूल करणाऱ्यांकडे लक्ष देण्याची गरज नाही.'' अनंत लोखंडे, अध्यक्ष, मनपा कामगार युनियन.

युनियनच्या कार्याध्यक्ष, उपाध्यक्षांचा राजीनामा कर्मचाऱ्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर युनियनच्या पदाधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. युनियनचे कार्याध्यक्ष पाशा शेख व उपाध्यक्ष महादेव कोतकर यांनी आपले राजीनामे अध्यक्षांकडे सादर केले आहेत. यासंदर्भात युनियनने गुरुवारी तातडीची बैठक घेतल्याचे समजते. यात कार्याध्यक्षांचा राजीनामा मंजूर करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. तर कोतकर यांची समजूत काढल्याचे सांगण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...