आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी इम्पॅक्ट:चौपट दराची निविदा स्थायी ने नाकारली

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सण व उत्सव काळात बंदोबस्तासाठी बॅरिकेटिंग करणे, मंडप, शामियाना उभारणे आदी विविध कामांसाठी महापालिकेने ९५ लाखांचा खर्च प्रस्तावित करून मागविलेल्या निविदेवर स्थायी समितीच्या सभेत आक्षेप घेण्यात आला. सभापती कुमारसिंह वाकळे यांनी ९५ ऐवजी ३० लाखांच्या खर्चाची तरतूद करत निविदा मंजूर केली.

मागील वर्षी महापालिकेने १२ महिन्यांसाठी २४ लाख रुपये खर्चाची निविदा मंजूर केली होती. या निविदेची मुदत सप्टेंबर महिन्यात संपत आहे. त्यामुळे महापालिकेने पुन्हा वार्षिक निविदा मागविली. यात महापालिकेने चालू वर्षासाठी तब्बल ९५ लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित केला. दिव्य मराठीने वृत्त प्रकाशित करत ही बाब समोर आणली होती. सभेत नगरसेवक गणेश कवडे यांनी “िदव्य मराठी’चे वृत्त सर्वांच्या निदर्शनास आणून चौपट दराने खर्च का प्रस्तावित करण्यात आला, असा जाब विचारला. नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे यांनीही कशाच्या आधारे व कोणत्या कारणासाठी खर्च वाढवण्यात आला, असा सवाल केला. निविदा स्थगित ठेवावी, अशी मागणी करण्यात आली.

प्रशासनाकडून शहर अभियंता सुरेश इथापे यांनी माहिती देण्याचा प्रयत्न केला. मागील वर्षी २४ लाख रुपये खर्च प्रस्तावित करण्यात आला होता. मात्र तेवढा खर्च झाला नाही. मनपाने ९५ लाख रुपये खर्च प्रस्तावित केला असला, तरी ठेकेदाराने १५ टक्के कमी दराने निविदा भरली आहे. यात फक्त दर मंजूर केले जातात. वर्षभरात जसा खर्च होईल, त्याप्रमाणे बिले मंजूर केली जातात. तसेच मागील काही प्रलंबित देयके देण्यासाठीही तरतूद ठेवावी लागते, असे स्पष्टीकरण केले. मात्र, कशाच्या आधारावर व कोणते दर जादा प्रस्तावित का करण्यात आले, याचे उत्तर मात्र प्रशासन देऊ शकले नाही. मुख्य लेखाधिकारी शैलेश मोरे यांनीही दर मंजूर करावेत व खर्च ३० लाख रुपये प्रस्थापित करावा. जास्त खर्च करण्याची वेळ आल्यास स्थायी समितीकडून वाढीव मंजुरी घ्यावी, अशी सूचना केली. त्यानुसार सभापती वाकळे यांनी ९५ लाखाचा खर्च रद्द करून ३० लाख रुपये खर्च प्रस्तावित करत वार्षिक निविदा मंजूर केली.

ध्वज वितरणावरूनही अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार
२१ लाखांच्या ध्वज खरेदीवरूनही स्थायी समिती सदस्यांनी प्रशासनावर प्रश्नांचा भडिमार करत धारेवर धरले. अनेक भागात नागरिकांना मोफत झेंडे मिळाले नाहीत, असे सदस्यांनी निदर्शनास आणले. तर काही ठिकाणी महापालिकेने वितरित केलेले झेंडे परस्पर विकण्यात आले, असा आरोप नगरसेवक मुदस्सर शेख यांनी केला. नगरसेवक रवींद्र बारस्कर यांनीही कोणत्या भागात किती झेंडे वितरित केले, असा सवाल केला. झेंड्याचे वितरण कोणाला व कसे झाले, कोणत्या भागात, प्रभागात किती झेंडे वाटण्यात आले, याची माहिती प्रशासनाला देता आली नाही.

बातम्या आणखी आहेत...