आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील कचरा संकलन व वाहतुकीचे काम करणाऱ्या स्वयंभू ट्रान्सपोर्टच्या कामाची मुदत संपुष्टात आली आहे. मनपा प्रशासनाकडे या कामासाठी तीन कंपन्यांच्या निविदा दाखल झाल्या आहेत. पुण्याच्या एका कंपनीसह कर्नाटकातील बेंगलोर व गुजरातमधील अहमदाबाद येथील कंपन्यांनी नगर शहरात काम करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, अद्यापही निविदा प्रक्रिया रखडली आहे.
महापालिकेकडे पुण्यातील बीव्हीजी इंडिया लिमिटेड, बेंगलोर येथील पी. गोपीनाथ रेड्डी व अहमदाबाद येथील श्री जी एजन्सी या तीन कंपन्यांच्या निविदा दाखल झाल्या आहेत. दाखल झालेल्या निविदांपैकी पुण्याच्या बीव्हीजी इंडिया लिमिटेड या कंपनीच्या निविदेवर आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळे निविदा दरपत्रके उघडण्यापूर्वीच बीव्हीजी इंडिया कंपनीची निविदा वादात सापडली आहे. प्रशासनाने या कामासाठी फेरनिविदा मागवाव्यात, अशी मागणीही पुढे आली आहे. यासंदर्भात महापालिका प्रशासनाने भूमिका स्पष्ट केलेली नाही.
अद्याप निविदांबाबत पुढील कार्यवाही झालेली नसल्याने जुन्याच ठेकेदाराला मुदतवाढ देऊन काम सुरू आहे. येत्या सोमवारी महापालिकेच्या तांत्रिक छाननी समितीमार्फत प्राप्त झालेल्या निविदनांची छाननी केली जाणार असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले. मात्र, यापूर्वी दोन वेळा प्रक्रिया प्रस्तावित असूनही झालेली नाही.
त्यामुळे या सोमवारी छाननी होऊन निविदा प्रक्रिया मार्गी लागणार का, याकडे लक्ष लागले आहे.दरम्यान, स्वयंभू ट्रान्सपोर्ट या संस्थेची ऑगस्ट महिन्यापासूनची पावणे तीन कोटी रुपयांची बिले मनपाने थकवली आहेत. त्यामुळे त्यांनी काम बंद करण्याचा इशारा दिला आहे. स्वयंभू ट्रान्सपोर्टने काम बंद केल्यास शहरातील कचरा संकलन कोलमडण्याची शक्यता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.