आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुका तालुक्यातील बहुतांशी गावाला मंगळवारच्या अवकाळी वादळी पावसाने तडाखा दिला. यात गहू, मका, कांदा, घास यासारख्या पिकांचे नुकसान झाले. गहू व मका तर आडवे पडले. खडकी परिसरात संत्राबांगाना मोठा फटका बसला आहे. तयार झालेली फळे जोरदार वाऱ्यामुळे गळून पडली असून यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कापूरवाडी परिसरात कांदा पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी चिंता ग्रस्त झाला आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. शेतकऱ्यांना मंगळवारी सकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाचा फटका बसला. अचानक मेघगर्जनेसह वादळी पावसाला सुरुवात झाली. खडकी, बाबुर्डी बेंद, खंडाळा, वाळकी, जाधववाडी, सारोळा कासार, भोरवाडी, निमगाव वाघा, येथील संत्रा बागांचे मोठे नुकसान झाले.
संत्राफळे आता तयार झाली असून तोडणीला आले आहेत. पण वादळी पावसात या संत्रा फळांना चांगला फटका बसुन फळे झाडावरून खाली पडली. बागेत गळुन पडलेल्या संत्रा फळांचा खच पडला होता. कापुरवाडी, वारूळवाडी, जेऊर, डोंगरगण, धनगरवाडी, पिंपळगाव माळवी, ससेवाडी भागात गहू, मका, कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले. काढणीला आलेला गहू भुईसपाट झाल्याने शेतकरी काळजीत पडला आहे. निंबळक, वडगाव गुप्ता, हिंगणगाव, चिचोंडी पाटील, रूई छत्तीशी परिसरात गहू, मका, कांदा पिकांचे नुकसान झाले. तसेच भाजीपाला आणि फळभाज्या यांचेही मोठे नुकसान झाले आहे. कमी अधिक प्रमाणात तालुक्यातील बहुतांश भागात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.
पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी
मी माझी संत्रा फळबाग वर्षभर जपली आहे. बहारापासून आजपर्यंत लाखो रुपयांचा खर्च या बागेवर केला आहे. एप्रिल- मे महिन्यात संत्रा फळांना चांगली मागणी असल्याने चांगले पैसे मिळतील या आशेवर होतो .पण मंगळवारच्या पावसाने बागेतील ७० टक्के फळे गळली. प्रशासनाने पंचनाने करत नुकसान भरपाई द्यावी. - संदीप रघुनाथ कोठुळे, शेतकरी, खडकी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.