आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:लम्पी आजारावर जाणीव, जागृती होणे गरजेचे ; तुंबारे

संगमनेर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेरची दुधाचा तालुका म्हणून ओळख आहे. येथे मोठे पशुधन आहे. काही भागात लम्पी आजाराचा संसर्ग वाढत असल्याने त्यावर वेळीच काळजी घेतली तर आपण प्रादुर्भाव रोखू शकतो. म्हणून या आजाराचे प्राथमिक लक्षणे, त्यावर करावयाच्या उपायोजना याबाबत शेतकऱ्यांमध्ये जास्तीत जास्त जाणीव जागृती करा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे यांनी केले.

संगमनेर तालुका दूध संघातर्फे जिल्हा परिषद, पंचायत समितीचे व संघातील पशुवैद्यकीय अधिकारी यांचे लम्पी आजाराबाबत चर्चासत्र घेण्यात आले, यावेळी डॉ. तुंबारे बोलत होते. दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, सहाय्यक पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जे. के. तिटमे, डॉ. वर्षा शिंदे, संतोष वाकचौरे, कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी, संघाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय कवडे, डॉ. प्रमोद पावसे उपस्थित होते.

डॉ. तुंबारे म्हणाले, लम्पी साथीचा आजार आहे. डास, गोचीड, माशा, चिलटे यापासून आजाराचा प्रसार होत आहे. जनावरांना ताप येणे, अंगावर गाठी उठणे, नाका डोळ्यातून पाणी वाहने असे काही लक्षणे आढळली तर तातडीने शासकीय अधिकाऱ्यांची संपर्क साधावा. प्रादुर्भाव रोखायचा असेल तर स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मूलभूत कर्तव्य म्हणून शेतकऱ्यांमध्ये जाणीव, जागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले. देशमुख म्हणाले, तालुक्यातील प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात पशुधन आहे. मोजक्या काही गावात लम्पी आजाराचे लक्षणे आढळलेले पशुधन आहे. याबाबत शासकीय व दूध संघाच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी आजाराचा प्रादुर्भाव होणार नाही, यासाठी स्वच्छतेसह इतर बाबीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. प्रास्ताविक कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी यांनी, तर आभार पशुवैद्यकीय अधिकारी विजय कवडे यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...