आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्हस्केवाडी येथे झांडाचा वाढदिवस साजरा:प्राणवायू देत असल्याने पृथ्वीवर झाडांशिवाय मोठे कोणी नाही; अभिनेते सयाजी शिंदे यांचे प्रतिपादन

पारनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पृथ्वीतलावरील प्रत्येक सजीव प्राणवायू शिवाय जगू शकत नाही. केवळ झाडेच प्राणवायूचा पुरवठा करतात. कितीही श्रीमंत व्यक्ती असली तरी दुसऱ्याला प्राणवायू पुरवू शकत नाही.सावली देऊ शकत नाही. त्यामुळे पृथ्वीतलावर झाडांशिवाय कोणीही मोठे नाही, असे प्रतिपादन अभिनेते व सह्याद्री देवराईचे संस्थापक सयाजी शिंदे यांनी केले.

तालुक्यातील म्हस्केवाडी येथील ग्रामस्थांनी गेल्या पाच वर्षांपासून अभिनेते शिंदे यांच्या प्रेरणेतून डोंगरावरील खडकाळ गायरानात देवराई रुजवण्यास सुरूवात केली आहे.आत्तापर्यंत लागवड करण्यात आलेल्या व सुमारे साडेसहा हजार झाडांचा वाढदिवस शिंदे यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला तसेच नव्याने १ हजार ७०० झाडे लावण्यात आली.यावेळी ‘येऊन येऊन येणार कोण, झाडांशिवाय आहेच कोण’ या घोषणेने परिसर दणाणून गेला होता. वृक्षारोपणानंतर म्हस्केवाडी येथील गणेश मंदिरात आयोजित कार्यक्रमात अभिनेते शिंदे बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवी भरत दौंडकर होते.

म्हस्केवाडी येथील पर्यावरणप्रेमी पांडुरंग सोनवणे, प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप, औरंगाबाद येथील देवराईचे संस्थापक पोपट रसाळ,महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य दिनेश औटी, पारनेर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमारे, संजय देशमुख,सुदाम म्हस्के, सरपंच किरण पानमंद,राजू म्हस्के, अरूण माळी आदी यावेळी उपस्थित होते. अभिनेते शिंदे म्हणाले, झाडे ही पृथ्वीतलावरील खरीखुरी निर्मिती आहे. झाडे एकदा रूजली की शेकडो वर्षे टिकतात. नवी झाडे रुजवत राहतात. वृक्षारोपणासाठी ग्रामस्थांबरोबरच म्हस्केवाडी,अळकुटी येथील प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सुदाम म्हस्के यांनी, तर आभार राजू म्हस्के यांनी मानले.

खडकाळ जागेवर हजारो झाडे दिमाखात उभी
सह्याद्री देवराई प्रकल्पाच्या माध्यमातून,ज्या खडकावर गवतही उगवत नव्हते अशा जागेवर हजारो झाडे दिमाखात उभी आहेत.त्यासाठी अभिनेते शिंदे व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून ग्रामीण भागात मुक्काम ठोकत आहेत.कोरड्या भुईला हिरवेगार करण्याच्या वेडाने झपाटलेले अभिनेते शिंदे एखाद्या सम्राटापेक्षा कमी नाहीत.''
भरत दौंडकर,कवी.

भाषणबाजीवर नव्हे, प्रत्यक्ष कृतीवर विश्वास
भाषणबाजीवर नव्हे तर प्रत्यक्ष कृतीवर आपला विश्वास आहे.एक कोटी वृक्षलागवड आणि संवर्धानाचे आपले ध्येय आहे.राज्यात ४० ठिकाणी सह्याद्री देवराई प्रकल्पाच्या माध्यमातून वेगाने वृक्षलागवड सुरू आहे.या मोहिमेत अबालवृद्धांचा सहभाग अपेक्षित आहे, असे अभिनेते शिंदे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...