आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसला टोला:काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न हाच, काँग्रेस भक्कम झाल्याचा पुरावा

नगर4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर शहरात यापूर्वी दिवंगत शिवसेना उपनेते अनिल राठोड यांची शिवसेना फोडण्यासाठी शहराचे आमदार आटापीटा करायचे, परंतु, आता काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या आमदारांना आव्हान निर्माण झाले. त्यामुळे आता काळेंची काँग्रेस फोडण्यासाठी शहरातील आमदारांचा आटापीटा सुरू आहे, हाच शहर काँग्रेस भक्कम झाल्याचा पुरावा आहे, असा टोला शहर ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा यांनी लगावला.

काँग्रेसचे माजी शहर उपाध्यक्ष अनंत गारदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यापार्श्वभूमीवर गुंदेचा म्हणाले, गारदे अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत होते. त्यांना काँग्रेसमध्ये पद देऊन त्यांचा सन्मान केला. परंतु, त्यांच्यावर दबाव होता. काँग्रेस फोडण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून आटापीटा सुरू आहे. गारदे यांनी पक्षनिष्ठा न पाळता ते दहशतीपुढे झुकले. मैदान सोडण्याच्या कृतीमुळे गारदे यांना राजीनामा देण्याचे आदेश शहर जिल्हा काँग्रेसने दिले होते.

त्यानुसार हकालपट्टीच्या भितीपोटी गारदे यांनी राजीनामा दिला. काळेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पळपुट्यांचा पक्ष नाही. काँग्रेसची जोरदार बांधणी शहरात सुरू आहे. समाजवादी पक्षाच्या नगरसेवकाच्या प्रवेशानंतर अनेक चांगले चेहरे संपर्कात आहेत. लवकरच त्यांचा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश होईल, असे गुंदेचा यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...