आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहमदनगर जिल्ह्यात यंदा पाऊस वेळेवर आल्यास खरीप हंगामात तूर, मूग, उडीद, सोयाबीन व मका पिकाच्या क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज आहे. यंदाच्या खरीप हंगामात ६ लाख ६८ हजार ५३५ हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी होईल. त्यानुसार कृषी विभागाने तयारी केली असून खरिपासाठी लागणारे रासायनिक खतांची उपलब्धता केली आहे.
नगर जिल्ह्याचे खरीपाचे सरासरी क्षेत्र ४ लाख ४७ हजार ९०३ हेक्टर आहे. नगर जिल्हा पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणून गणला जातो. त्यामुळे रबीच्या तुलनेत खरिपाचे क्षेत्र कमी आहे. रब्बीचे सरासरी क्षेत्र ७ लाख २० हजार हेक्टर आहे. नगर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी खरीपपूर्व मशागतीची कामे उरकली असून ते आता पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
सर्वाधिक क्षेत्रावर कापूस
आगामी खरीप हंगामात तूर, मूग, उडीद, सोयाबीन, मका या पिकांच्या क्षेत्रात वाढ होणार आहे. कापूस १ लाख २८ हजार १३७ हेक्टर, सोयाबीन १ लाख २४ हजार ८०४ हेक्टर, तुरीची पेरणी ६८ हजार ४४५ हेक्टरवर, मूग ५७ हजार ९१३ हेक्टर, उडीद ८३ हजार ४०१ हेक्टर, मका ७१ हजार ८८८ हेक्टर, तर भाताचे पीक १८ हजार ८०८ हेक्टरवर असेल. बाजरी पिकाच्या क्षेत्रात घट होणार असून ९३ हजार ५४२ हेक्टरवर बाजरीची पेरणी होईल. मागील खरिपात १ लाख ३ हजार ३२ हेक्टरवर बाजरीची पेरणी झाली होती.
उत्पादकता १४.६० क्विंटल राहील
आगामी खरीप हंगामात जिल्ह्याची उत्पादकता हेक्टरी १४ क्विंटल ६० किलो राहील, असा अंदाज आहे. सन २०२१-२०२२ या वर्षात खरीप हंगामात ६ लाख ८० हजार ५४९ मेट्रीक टन उत्पादन झाले होते. उत्पादकता प्रति हेक्टरी १० क्विंटल ९३ किलो एवढी मिळाली होती. अतिवृष्टी व अवकाळी पावसाचा खरिपाला फटका बसला होता.
पाऊस वेळेवर आल्यास खरीप क्षेत्रात वाढ होईल
खरीप हंगामासाठी युरिया, डीएपी, एमओपी, संयुक्त खते, एसएसपी आदी रासायनिक खतांची एकूण २ लाख ७५ हजार ५०५ टन मागणी केली. यातून २ लाख २५ हजार ५०० टन खताचे आवंटन झाले. ७ ते १५ जून या कालावधीत पाऊस झाल्यास तूर, मूग, उडीद, सोयाबीन, मका या पिकांच्या क्षेत्रात वाढ होईल. कापसाचे क्षेत्र स्थिर राहील. पाऊस वेळेवर आल्यास खरिपाच्या क्षेत्रात वाढ होईल.''
शिवाजीराव जगताप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अहमदनगर.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.