आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंगमनेर तालुक्यातील सर्वच संस्थांनी प्रगती साधल्याने त्या राज्यात पहिल्या क्रमांकाने गणल्या जात आहेत. थोरात कारखान्यानेही यंदाच्या हंगामात विक्रमी १५ लाख ५१ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. विकास कामातही तालुका अग्रस्थानी आहे. यामुळे येथील विकास काहींना खुपत आहे. निळवंडे धरणाला योगदान न देणारे बेताल वक्तव्य करत आहेत. जनतेची दिशाभूल करत आहे. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. ऑक्टोबरपर्यंत दुष्काळी भागाला डाव्या व उजव्या दोन्ही कालव्यातून पाणी देण्याचा आपला प्रयत्न राहील, असे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्या सन २०२१-२२ गळीत हंगाम सांगता समारंभात मंत्री थोरात बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव ओहोळ यांनी अध्यक्षस्थान भूषविले. आमदार डॉ. सुधीर तांबे, समाजसेविका कांचन थोरात, दुर्गा तांबे, इंद्रजीत थोरात, बाजीराव खेमनर, डॉ जयश्री थोरात, डॉ. प्रेरणा शिंदे, मधुकर नवले, सभापती मिरा शेटे, सुनंदा जोर्वेकर, नवनाथ आरगडे, अजय फटांगरे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर उपस्थित होते. ३७ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सपत्नीक आंबा वृक्ष, अमृतमंथन व अमृतगाथा पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.
मंत्री थोरात म्हणाले, निवडणुका आल्यावर विरोधक बेताल वक्तव्य करत सुटतात. खोटेनाटे बोलतात. टीकाटिपणी करतात. शहराला शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असताना आरोप करत आहे, त्यांना हे ज्ञान येते कुठून हा प्रश्न आहे. तालुक्यातील जनतेच्या प्रेमामुळे न नेतृत्वामुळे राज्यात मोठा सन्मान मिळत आहे. तालुक्याच्या विकासासाठी मोठा निधी मिळवला. विकास कामांसह निळवंडे धरण कालव्यांच्या कामाला गती दिली. काम प्रगती पथावर आहे. काटकसर व ठिबक सिंचनाचा वापर करुन दुष्काळी भागाला पाणी देण्याचा ध्यास आहे. तालुक्यातील ७६ गावच्या वाडीवस्त्यांच्या पाणी योजनेसाठी ६१६ कोटी रुपये तर तलाव दुरुस्तीसाठी ३२ कोटी रुपयांचा निधी आणला. शहरातील रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. थोरात कारखाने उत्कृष्ट काम करत अन्य कारखान्यांना गाळप करण्यात मदत केली. सुमारे एक हजार हेक्टर वरील ऊसाची नोंद न झाल्याने नियोजनात अडचणी आल्या. यासाठी शेतकऱ्यांनी ऊसाची नोंदणी करणे गरजेचे असून हेक्टरी उत्पादन वाढवण्यावर भर द्यावा. तालुक्याची प्रगती कायम राहील, असे मंत्री थोरात यांनी सांगितले.
ओहोळ म्हणाले, मंत्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली थोरात कारखान्याने १५ लाख ५१ हजार मेट्रिक टन ऊसाचे उच्चांकी गाळप केले. कर्मचारी, सभासद, ऊस उत्पादक व संचालक मंडळ यांचे यश असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी तर उपाध्यक्ष संतोष हासे यांनी आभार मानले.
अमृतशक्ती सेंद्रिय खत व डिस्टलरी प्लांटचे भूमिपूजन
कारखान्याच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या अमृतशक्ती दाणेदार सेंद्रिय खत प्रकल्पाचे उद्घाटन, डिस्टलरी प्लांट व कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.