आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धडक कारवाई:खंडणीसाठी अपहरण करणारे तिघे सराईत गुन्हेगार जेरबंद; वेषांतर करून सापळा रचत ठोकल्या बेड्या

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

खंडणीसाठी पिस्तुलाचा धाक दाखवून अपहरण करणारे तीन सराईत गुन्हेगार नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहेत. एलसीबीच्या पथकाने वेशांतर करून सापळा रचला व राहुरीतून मुख्य आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी आज दिली.

पिस्तुलचा दाखवला धाक

27 एप्रिल रोजी भाऊसाहेब धोंडीराम देव्हारे (वय - 48) यांचे किरण दुशिंग व इतर अज्ञात तीन व्यक्तींनी पिस्तुलाचा धाक दाखवून जिवे ठार मारण्याचे उद्देशाने अपहरण केले होते. खिशातील पैसे व मोबाइल, दुचाकी असा ऐवज काढून घेतला. मारहाण करून 3 लाख 50 हजार रुपयांची खंडणी मागितली होती. देव्हारे यांनी लोहारे गावातील मंदिरासमोर लोकांची गर्दी पाहून गाडीचा दरवाजा उघडून आरडा ओरडा केल्याने जमलेल्या लोकांनी कार अडवली व आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला.

गुन्ह्यातील मुख्य आरोपी किरण दुशिंग हा राहुरी एसटी स्टॅण्ड जवळ येणार असल्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी पोसई सोपान गोरे, सफौ राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, पोहेकॉ बापुसाहेब फोलाणे, देवेंद्र शेलार, पोना भीमराज खर्से, शंकर चौधरी, रवीसोनटक्के, पोकॉ रणजीत जाधव व चापोहेकॉ बबन बेरड यांच्या पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने वेशांतर करुन सापळा लावला व किरण ऊर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग (वय - 27) याला ताब्यात घेतले.

आरोपींना घेतले ताब्यात

दरम्यान, हा गुन्हा त्याने व त्याचा साथीदार सुधीर संपत मोकळ (वय - 23) व संदीप ऊर्फ बंडू रंगनाथ कोरडे (वय - 32) यांनी एकत्रितपणे केल्याचे त्याने तपासात सांगितले. त्यानुसार मोकळ याला संगमनेर येथून शिताफीने ताब्यात घेतले. तर संदीप कोरडे याला घोगरगाव (ता. श्रीगोंदा) येथे घरातून ताब्यात घेतले आहे. किरण दुशिंग याने गुन्ह्यात वापरलेली गाडी मध्यप्रदेशमधून चोरी केल्याचे स्पष्ट झाले. सदर गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली. पुढील कारवाई संगमनेर तालुका पोलिस स्टेशन करत आहे.

तिन्ही आरोपी सराईत गुन्हेगार

तिन्ही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. किरण दुशिंग याच्याविरुध्द पुणे, नाशिक व नगर जिल्ह्यात विविध पोलिस ठाण्यात खून, अपहरणासह खून, अपहरण, जबरी चोरी, घरफोडी असे 11 गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर सुधीर मोकळ याच्या विरुध्द पोक्सो व अपहरण असे 2 गुन्हे दाखल आहे. आरोपी संदीप कोरडे विरुध्द अपहरणासह खून करणे, चोरी असे 3 गुन्हे दाखल आहेत.

बातम्या आणखी आहेत...