आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील खांडगावच्या श्रद्धा भगवान गुंजाळ या विद्यार्थिनीने गुणवत्तेच्या जोरावर उच्च माध्यमिक परीक्षेत उत्तम गुणांच्या बळावर एमआयटी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. आपल्या आवडीचा ‘एरोस्पेस इंजिनिअरिंग’ हा विषय निवडून तिने आपल्यातील प्रगल्भताही सिद्ध केली. त्यातून विविध पारितोषिकांसह पुढील शिक्षणासाठी तिची नासामध्ये निवड झाली, मात्र घरची परिस्थिती अतिशय बेताची असल्याने उंच भरारी घेण्याच्या तिच्या स्वप्नांना खिळ बसली.
याबाबत डॉ. संजय मालपाणी यांना माहिती मिळताच त्यांनी या विद्यार्थिनीसह तिच्या पालकांची भेट घेत तिच्या पंखात बळ भरले. आपल्या कन्येचे स्वप्नं मालपाणी परिवाराच्या मदतीने पूर्ण होत असल्याचे पाहतांना शेतकरी कुटुंबातील गुंजाळ परिवाराच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
संगमनेर शहरापासून अवघ्या काही अंतरावर खांडेश्वराच्या राऊळाभोवती वसलेल्या खांडगावात भगवान गुंजाळ हे अल्पभूधारक शेतकरी पत्नी रोहिणी, मुलगी श्रद्धा व मुलगा साई यांच्यासह राहतात. त्यांची मुलगी श्रद्धा ही अभ्यासात हुशार असल्याने तिच्या आई-वडीलांनी तिला प्रोत्साहन दिलं.
या सर्वांच्या जोरावर अमेरिका स्थित अलाबामा प्रांतात असलेल्या नासा संस्थेत पुढील शिक्षणासाठी तिची निवड झाली. नासामध्ये निवड होणे हा खूप मोठा बहुमान असल्याने श्रद्धाच्या आनंदाला पारावार राहिला नाही, मात्र त्याचवेळी तिला आपल्या परिस्थितीचीही जाणीव झाली. पैशांमुळे मुलीला परदेशात शिक्षणाची संधी मिळूनही जाता येत नसल्याचे दुःख श्रद्धाच्या आई वडिलांना सतावू लागले.
श्रद्धाच्या हुशारीची आणि तिची नासामध्ये निवड झाल्याची माहिती शिक्षणतज्ञ डॉ.संजय मालपाणी यांना समजली. श्रद्धाशी संपर्क साधून तिला तिच्या आई-वडील व भावासह आपल्या कार्यालयात बोलावले. त्यांनी श्रद्धाशी गप्पा मारतांना तिचे ध्येय जाणून घेतले. शिक्षणाविषयीची तिची ओढ पाहून डॉ. मालपाणी यांनी नासामध्ये जाण्यासाठी तिला आर्थिक मदत देण्याची तयारी दाखवली.
मालपाणी उद्योग समूहाचे अध्यक्ष राजेश मालपाणी, डॉ. संजय, मनिष, गिरीश व जय मालपाणी यांच्या उपस्थितीत विपरित परिस्थितीतही उच्च शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या श्रद्धाचा आणि त्यासाठी तिला सतत प्रोत्साहन देणाऱ्या तिच्या कुटुंबाचा विशेष सत्कार करुन तीन लाख रुपयांचा धनादेश तिच्या वडीलांकडे दिला मालपाणी परिवाराने दाखवलेल्या या दातृत्त्वाने एका सामान्य विद्यार्थिनीला उंच भरारी घेण्यासाठी पंखांना बळ मिळाले. आपण दाखवलेला विश्वास सार्थ ठरवूनच परत येईल असा शब्द यावेळी श्रद्धाने सर्वांना दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.