आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्घटना:बोधेगाव येथे लागलेल्या भीषण आगीमध्ये तीन दुकाने भस्मसात

बोधेगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोधेगाव येथे शुक्रवारी (२६ ऑगस्ट) साध्वी बन्नोमां दर्ग्यालगत असलेले पुरोहित स्वीट या दुकानास मध्यरात्री १२ च्या दरम्यान आग लागली. त्यामुळे शेजारील इतरही दोन दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने तिन्ही दुकानांचे मिळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. दरम्यान, आग लागल्याचे समजताच गावातील तरुणांनी तत्परता दाखवत आगीचे भय न बाळगता धाडसाने स्थानिक खासगी पाण्याच्या टँकरच्या मदतीने आग विझवली. त्यांमुळे शेजारची इतर दुकाने आगीच्या झळापासून बचावली.

शेवगाव-गेवराई रोडवर श्रीवास्तव व्यापारी संकुलातील पुरोहित स्वीटमधील कर्मचारी पोळा सणाच्या दिवशी रात्री पावणे बाराच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले. त्यानंतर रात्री साडेबाराच्या दरम्यान पत्रकार उद्धव देशमुख हे दवाखान्यात जात असताना त्यांना पुरोहित दुकानास आग लागल्याचे लक्षात आले. त्यांनी याची कल्पना दुकान मालकाला देत गावातील तरुणांनाही जागे केले.

अवघ्या १५ से २० मिनिटांत आलेल्या तरुणांनी प्रथमतः वीज पुरवठा बंद करत स्थानिक खासगी पाण्याचे टँकर बोलावून त्याच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीच्या रौद्रावतारमुळे दुकानाजवळ देखील जाणे शक्य होत नव्हते. अग्निशमनची गाडी घटनास्थळी येईपर्यंत पुरोहित स्वीटच्या बाजुच्या दोन्ही दुकानांने पेट घेतला. एका तासाच्या अंतराने आलेल्या अग्निशमन गाडीने आग आटोक्यात आणली. यावेळी बोधेगाव पोलिस दूरक्षेत्राचे सहायक पोलिस उपनिरीक्षक भगवान बडधे, पोलिस कॉन्स्टेबल उमेश गायकवाड घटनास्थळी हजर झाले. दरम्यान, या आगीत पुरोहित यांच्या दुकानातील चार डी फ्रीज, मिठाई, फर्निचर आणि विविध उपकरणे, केशकर्तनालयातील खुर्च्या विविध सौंदर्य प्रसाधने आणि उपकरणे, तर सागर लाड यांचे मेडिकलमधील औषधाचे फर्निचर आगीच्या भक्ष्यस्थानी सापडुन एकत्रित लाखो रुपयांचे मोठे नुकसान झाले. आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेल्या पुरोहित स्वीटच्या दुकानात गॅस टाक्या असताना तरुणांनी जीव धोक्यात घालून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. समोर धोका दिसत असतानाही तरुणांनी केलेल्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतूक होत आहे.

बंब येण्यास उशीर
आग लागल्याचे समजताच तरुणांनी केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अग्नीशमन दलाला फोन करून माहिती दिली. मात्र गाडीत बिघाड असल्याचे उत्तर मिळाले. त्यानंतर गंगामाई साखर कारखान्यावरील अग्निशमन दलाला फोनवरून कल्पना दिल्यावर सुमारे तासाभराने बंब घटनास्थळी दाखल झाल्यावर आग आटोक्यात आली. त्यामुळे आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले. केदारेश्वर कारखान्याच्या अग्निशमन बंबात बिघाड नसता, तर एवढे नुकसान झाले नसते, अशी चर्चा गावात होती.

बातम्या आणखी आहेत...