आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाईचे आदेश:वेळ बदलली, पण ‘ती’ शाळा उशिरा उघडली; सीईओ लांगोरेंनी दिले कारवाईचे आदेश, जिल्हाभरातील तब्बल 462 शाळांची पर्यवेक्षकीय तपासणी

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवारपासून जिल्ह्यातील शाळांची वेळ सकाळी सात ते साडेबारा करण्यात आली. पहिल्याच दिवशी जिल्हाभरातील तब्बल ४६२ शाळांची पर्यवेक्षकीय तपासणी करण्यात आली. नगर तालुक्यातील होळकर वस्ती शाळा सात वाजेपर्यंत उघडीलच नसल्याचे दिसून येताच, मुख्यकार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांनी संबंधित शिक्षकांवर कारवाईचे आदेश दिले.

उन्हाचा कडाका वाढत असल्याने जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमित शाळांची वेळ सोमवारपासून सकाळी सात ते साडेबारा करण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आणि सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. वेळेत केलेला बदल किती यशस्वी होतो, याची चाचपणी करण्यासाठी स्वत: मुख्यकार्यकारी अधिकारी लांगोरे तसेच जिल्हा शिक्षण अधिकारी भास्कर पाटील शाळा भेटीसाठी बाहेर पडले. याव्यतिरिक्त जिल्हाभर सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या यंत्रणांनी पहिल्याच दिवशी शाळांची पाहणी केली. ४६२ शाळांच्या पाहणीत मोजक्या दोन शाळा वगळता सर्व शाळा नियोजित वेळेत उघडल्या व पटसंख्याही चांगली आढळून आली.

मुख्यकार्यकारी अधिकारी लांगोरे व शिक्षणाधिकारी पाटील यांनी नगर तालुक्यातील होळकर वस्ती शाळेला सकाळी पावणेसात वाजताच भेट दिली. या भेटीत शाळाच उघडली नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ही शाळा दोन शिक्षकी आहे. याप्रकरणी संबंधित शिक्षकांवर कारवाईचे आदेश गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिले. त्यानुसार नोटिस बजावून पुढील कार्यवाही केली जाणार आहे. त्यानंतर पुन्हा याच शाळेला भेट दिल्यानंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता चांगली आढळून आली. नेप्ती जिल्हा परिषद शाळा ही पाच शिक्षकी असून तेथे २ शिक्षक उशिरा आल्याचे दिसून आले. सकाळी शाळा किमान पावणेसातपर्यंत उघडणे अपेक्षीत असून शिक्षकांनी वेळेत हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सीईओ संभाजी लांगोरे यांनी घेतला परिपाठ
मुख्यकार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांनी नगर तालुक्यातील रानमाळ शाळेला भेट देऊन परिपाठ घेतला. विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासणीही केली. दुसरीच्या मुलीने गुलाबाचे फुल देऊन स्वागत केले, तसेच तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी अवघड गुणाकार सोडवल्याने शिक्षकांसह विद्यार्थ्यांचेही कौतूक केले.

बातम्या आणखी आहेत...