आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लम्पी रोगाचा धसका:राज्यातील संपूर्ण पशुधनाचे लसीकरण करणार, बाजारावरही बंदी; पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखेंची माहिती

प्रतिनिधी/ नगर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील पशुधनांमधे लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. त्यामुळे या चर्मरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील पशुधनाचे शंभर टक्के लसीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. या आजारावरील उपचारासाठी सकारात्मकतेने कार्यवाही करावी, अशा सूचना पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्याचेही विखे-पाटील यांनी सांगितले.

जिल्ह्यातील जनावरांना लम्पी रोगाचा झालेला प्रादुर्भाव आणि त्यावरील उपाययोजना यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली पशुसंवर्धन विभागाची आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

पशुधन बाजारावर बंदी

राधाकृष्ण विखे यांनी बैठकीत पशुसंवर्धनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या. विखे म्हणाले, लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून बाधित जनावरांवर प्रभावी उपचार करावे. शेतकऱ्यांमध्ये याबाबत जागृती करावी. खासगी पशुवैद्यकीय व्यावसायिक लम्पीच्या उपचारावर शेतकऱ्यांची लूट करत असून अवाजवी खर्च करण्यास भाग पाडत आहे. शेतकऱ्यांचे शोषण होऊ नये आणि त्यांच्या तक्रारींचे निराकरण व्हायला हवे. या रोगाचा फैलाव होऊ नये, यासाठी राज्यामध्ये पशुधन बाजारावर बंदी घालण्यात आली असून, जिल्हा आणि राज्यात पशुधनाची वाहतूक बंद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

तालुका स्तरावर औषधांचा साठा

विखे यांनी सूचना केल्या की, जनावरांचे लसीकरण, गोठे, ओटे याठिकाणी औषधांची फवारणी प्राधान्याने करण्यात यावी. तहसीलदार, गट विकास अधिकारी आणि तालुक्यास्तरीय अधिकाऱ्यांनी या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दक्षता घेऊन युध्द पातळीवर काम करावे. खासगी पशुवैद्यकीय डॉक्टरांची मदत घ्यावी तसेच जिल्हा व तालुका स्तरावर या आजारावरील पुरेसा औषधांचा साठा शासनातर्फे उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री विखे यांनी दिली.

लसीकरणास प्राधान्य

खासदार पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह म्हणाले, लम्पी रोगाचे गांभीर्य ओळखून पशुधन विकास अधिकाऱ्यांनी जनावरांच्या उपचारासाठी जास्तीचा वेळ द्यावा. तसेच ज्या तालुक्यात या रोगाचे प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणच्या जनावरांचे ७२ तासांत लसीकरण पूर्ण करावे. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यात पशुधनाची संख्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त असल्याने जनावरांचे लसीकरण प्राधान्याने करावे, अशी सूचना केली. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सुनील तुमरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.संजय कुमकर यांनी बैठकीच्या सुरूवातीला उपाययोजनांची माहिती दिली.

बैठकीला खासदार सुजय विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.आशिष येरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...