आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावितरण:चुकीचे रिडींग घेणाऱ्या 47 एजन्सीज बडतर्फ ; मीटर रीडिंगसाठी राबवल्या विविध उपाययोजना

नगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लघुदाब वर्गवारीतील सुमारे २ कोटी १५ लाख ग्राहकांना वीजवापराप्रमाणे अचूक मीटर रीडिंगचे बिल देण्यासाठी महावितरणने गेल्या फेब्रुवारीपासून विविध उपाययोजनांना सुरवात केली आहे. यामध्ये हेतुपुरस्सर चुका व अचूक रीडिंगमध्ये हयगय केल्याचे आढळून आल्याने राज्यातील तब्बल ४७ मीटर रीडिंग एजन्सीजना बडतर्फ करण्यात आले आहे. यातील ८ एजन्सीजना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. या धडक उपाययोजनांमुळे मीटर रीडिंगच्या बाबतीत ग्राहकांच्या तक्रारींमध्ये मोठी घट झाली असून महावितरणच्या महसूलात देखील वाढ झाली आहे.

वीजगळती कमी करण्यासोबतच ग्राहकहिताच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करीत महावितरणने ग्राहकाभिमुख सेवेच्या सुधारणांना मोठा वेग दिला आहे. यात बिलिंगसाठी वीजमीटरच्या अचूक रीडिंगला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे. याबाबतीत आढावा घेताना १०० टक्के अचूक मीटर रीडिंग अपेक्षित असताना त्यात हयगय होत असल्याचे महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना आढळून आले. या प्रकाराची त्यांनी गंभीर दखल घेतली व महावितरणच्या इतिहासात प्रथमच राज्यातील सर्व मीटर रीडिंग एजन्सीजचे संचालक तसेच क्षेत्रीय उपविभाग कार्यालयांचे प्रमुख व लेखा अधिकारी यांची व्हीसीद्वारे आढावा बैठक घेतली होती. कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक वीजमीटरचे रीडिंग १०० टक्के अचूक झालेच पाहिजे. चुकीच्या वीजबिलांमुळे ग्राहकांना होणारा मनस्ताप व बिल दुरुस्तीचा त्रास तसेच महावितरणच्या महसूलाचे नुकसान सहन केले जाणार नाही. मीटरचे अचूक रिडींग घेण्यात हयगय करणाऱ्या एजन्सीजविरुद्ध कारवाई करावी’ असे निर्देश त्यांनी दिले होते.

त्याप्रमाणे गेल्या फेब्रुवारीपासून मुख्यालय व क्षेत्रीय कार्यालयांनी एकत्रितपणे पर्यवेक्षणातून मीटरच्या अचूक रीडिंगसाठी धडक उपाययोजनांना सुरवात केली आहे. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल हे दर पंधरवड्याला प्रामुख्याने अचूक मीटर रीडींग संदर्भात आढावा घेत आहेत. मुख्यालयासोबतच क्षेत्रीयस्तरावरील विविध उपाययोजना तसेच कामात कुचराई करणाऱ्या एजन्सीजविरुद्ध सुरु असलेली कारवाई यामुळे अचूक मीटर रीडिंगमध्ये लक्षणीय सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे. ग्राहकांना रीडिंगनुसार वीजवापराचे योग्य वीजबिल मिळत असल्याने त्यांच्या तक्रारींचे प्रमाण कमी झाले आहे. सोबतच गेल्या एक महिन्यात वीजविक्रीत १९९ दशलक्ष युनिटने म्हणजेच १४० कोटी रुपयांनी महावितरणच्या महसूलात वाढ झाली आहे.

चुकीचे रिडींग खपवून घेणार नाही ^ मीटरचे फोटो रीडिंग घेण्याची प्रक्रिया स्वतंत्र मोबाईल अॅपद्वारे सोपी व वेगवान झाली आहे. प्रत्येक मीटरच्या रीडिंगसाठी एजन्सीजना चांगला मोबदला दिला जातो. तरीही मीटरचे चुकीचे रिडींग घेणे व फोटो अस्पष्ट असणे, रीडिंग न घेता आल्याचा शेरा देणे आदी प्रकार होत असल्यास ते खपवून घेतले जाणार नाही.'' विजय सिंघल, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महावितरण.

८ रिडिंग एजन्सीज काळ्या यादीत गेल्या चार महिन्यांमध्ये मीटर रिडींगच्या कामात हयगय करणाऱ्या ४७ मीटर रीडिंग एजन्सीजना बडतर्फ केले. यात नांदेड परिमंडलातील १०, जळगाव- ८, अकोला- ७, लातूर, कल्याण, बारामती व नाशिक- प्रत्येकी ४, औरंगाबाद- २, तसेच पुणे, चंद्रपूर, कोकण व अमरावती परिमंडलातील प्रत्येकी एका एजन्सीचा समावेश आहे. यातील ८ एजन्सीजना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...