आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा परिषदेच्या साडेतीन हजारांवर शाळा आहेत. या शाळांमध्ये भौतिक सुविधा पुरवण्यासाठी निधीची नेहमीच अडचण भासते. यावर तोडगा काढण्यासाठी राज्यात प्रथमच १ मे २०२२ रोजी जिल्हा परिषदेने ‘मिशन आपुलकी’ उपक्रम हाती घेतला आहे. या अभियानातून १५ वर्गखोल्यांच्या उभारणीसह १८०० शाळांना १३ कोटींचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. या उपक्रमाचा ‘नगरी पॅटर्न’ राज्याला दिशादर्शक ठरत आहे. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी व विद्यमान अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यकाळात १ मे २०२२ पासून ‘मिशन आपुलकी’ हा उपक्रम हाती घेण्यात आला. या महत्वपूर्ण अभियानाला मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी गती दिली. जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, तसेच शिक्षण विभागातील समन्वयक रमेश कासार यांनी विविध कंपन्यांकडून ‘सीएसआर’ निधी मिळवण्यासाठी प्रस्ताव दाखल केले. लोकांनी शाळांचा कायापालट करण्यासाठी पुढाकार घेत ‘मिशन आपुलकी’चे स्वागत केले. आतापर्यंत सुमारे दीड कोटींच्या निधीतून १५ वर्गखोल्यांची उभारणी झाली आहे.
शाळांचा कायापालट कसा झाला?जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळांमध्ये आता संगणकासह एलईडी संच उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याचबरोबर इंटरॅक्टिव्ह बोर्ड (डिजिटल फळे) ४५० शाळांमध्ये उपलब्ध करून दिले आहेत. शंभर टक्के शाळांत वीजजोड देण्यासाठी प्रशासकीय स्तरावर माहिती मागवून वीजबिलाची तरतूद करण्यात येणार आहे. तसेच विजेसाठी इतर पर्यायही विचाराधीन आहेत.
१५० शाळा डिजिटल करण्याचे उद्दिष्ट‘मिशन आपुलकी’तून जिल्ह्यातील १५० शाळांवर सौरऊर्जा पॅनेल उभारणी करण्याचे नियोजन आहे. सौरऊर्जेतून वीज उपलब्ध होईल. त्याचबरोबर १०० टक्के शाळांमध्ये इंटरॅक्टिव्ह बोर्ड (डिजिटल फळे) उपलब्ध करून या शाळा डिजिटल करण्याचे उद्दिष्ट आहे. त्या अनुशंगाने विविध संस्थांनाही पत्र देण्यात आले आहे. - भास्कर पाटील, जिल्हा शिक्षणाधिकारी
तसेच शाळांमध्ये इंटरॅक्टिव्ह बोर्ड (डिजिटल फळे), शुद्ध पाण्यासाठी वॉटर फिल्टर, संगणक आदी साहित्य उपलब्ध करून दिले आहे. असा उपक्रम राबवणारी अहमदनगर ही राज्यातली पहिलीच जिल्हा परिषद ठरल्याचे प्रशासनाने सांगितले. जिल्ह्यात सुमारे ८०० वर्गखोल्या उभारण्याची आवश्यकता आहे. यासाठी जिल्हा नियोजनचा निधी अपुरा पडत आहे. त्यामुळे लोकसहभागाशिवाय पर्याय नाही.
‘मिशन आपुलकी’चा अर्थ?जिल्ह्यामध्ये शिक्षण घेऊन विविध पदांवर भरारी घेतलेल्या माजी विद्यार्थी, तसेच शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपुलकीच्या नात्याने शाळेला शैक्षणिक साहित्याची मदत करणे, हा प्रमुख हेतू या उपक्रमामागे आहे. त्याचबरोबर विविध सामाजिक संस्था, प्रतिष्ठान, कंपन्यांकडूनही आपुलकीच्या नात्याने जिल्हा परिषदेने मदतीचे आवाहन केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.