आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशभक्ती:8.99 लाख घरांवर फडकणार तिरंगा ; जिल्हाधिका-यांनी दिली अभियानाची माहिती

नगर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात या स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील नायक, क्रांतीकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, देशभक्तीची भावना कायमस्वरूपी जनमाणसात रहावी, या उद्देशाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव राज्यभरात राबवण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत केंद्र शासनाच्या सूचनेनुसार ‘घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम नगर जिल्ह्यात ८ लाख ९९ हजार ६६६ घरांवर फडकणार तिरंगा फडकणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी बुधवारी दिली.

नगर महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात घरांची संख्या १ लाख ९६ हजार ९०५ असून, तितकेच झेंडे फडकवण्यात येणार आहे. तसेच ग्रामीण भागातील घरांची संख्या ७ लाख २ हजार ७६१ इतकी असून, तितकेच झेंडे फडकवण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर ७ लाख ८० हजार ५७७ झेंडे उपलब्ध होणार असून, विभागीय आयुक्त कार्यालयाकडून १ लाख १९ हजार ७९ झेंडे पुरवण्यात येणार आहेत, असे जिल्हाधिकारी भोसले यांनी सांगितले.

दरम्यान, नगर शहरात हर घर तिरंगा अभियान यशस्वीपणे राबवण्यासाठी महापालिकेने विविध संघटनांच्या समन्वयातून मोहीम सुरु केली आहे. नागरिकांकडून नोंदणी करून घेतली जात आहे. शहरात ७५ हजार ९६० इमारतींवर तिरंगा ध्वज फडकवण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे.यात ५१ हजार ध्वज केंद्र सरकारकडून खरेदी केले जाणार आहेत. तर २५ हजार ध्वज महापालिका खरेदी करणार आहेत. शहरात महापालिका मुख्यालयासह चार प्रभाग समिती कार्यालये तसेच इतर ठिकाणे निश्चित करून जवळपास २० ध्वज विक्री केंद्र उभारण्यात येणार आहेत. या केंद्रांवर महापालिकेकडून सशुल्क ध्वजांची विक्री केली जाणार आहे. मनपाकडून नियोजनासाठी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

नागरिकांनी सहभाग नोंदवावा
जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद तसेच शासनाच्या विविध विभागांच्या वतीने या मोहिमेसाठी प्रशासकीय पातळीवर नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...