आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाकरेंनी घेतले शनिदेवाचे दर्शन:उद्धव ठाकरे म्हणाले - आत्मिक समाधान लाभले; यशवंतराव गडाखांच्या भेटीने लढण्यास बळ मिळाले

अहमदनगर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दीड वर्षांपूर्वीच ज्येष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख यांना भेटायला मला यायचे होते. परंतु त्यावेळेस येता आले नाही. गडाख यांनी आमदार शंकरराव गडाख हा लढणारा सैनिक मला संकट काळात दिला आहे. त्यांना मी कधीही विसरणार नाही. यशवंतराव गडाख यांच्या भेटीमुळे नवी ऊर्जा व लढण्यास बळ मिळाले. गेली अनेक वर्षे यशवंतराव गडाख यांनी नगर जिल्ह्यासह, राज्याच्या विकासात महत्त्वाचे योगदान आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

वाढदिवशी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या

माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी दुपारी माजी मुख्यमंत्री व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे व त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी सोनई येथील माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी आमदार शंकरराव गडाख यांनी स्वागत करून उद्धव ठाकरे यांचे स्वागत केले. यावेळी ते बोलत होते.

मैत्रीच्या आठवणींना उजाळा

उद्धव ठाकरे म्हणाले, माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी नेवासे तालुक्यातील गावांगावात निसर्ग संवर्धनाचे जे काम केले आहे, ते निश्चितच अभिमानास्पद आहे. कुटुंब उभे करण्याचे काम गडाख यांनी केले. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन यशवंतराव गडाख यांच्या हस्ते झाले असे सांगत त्यांनी बाळासाहेब व यशवंतराव गडाख यांच्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला.

शनीदेवाच्या चरणी ठाकरे

गडाख यांच्या निवासस्थानी भेटीनंतर उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांनी शनीशिंगणापूर येथे शनिदर्शन घेतले. शनिचौथऱ्यावर जाऊन विधिवत तेल अर्पण करून त्यांनी दर्शन घेतले. शनीदर्शन प्रसंगी मिलिंद नार्वेकर, विधानसभेचे माजी उपसभापती विजय औटी, शारदाताई गडाख, विश्वासराव गडाख, माजी सभापती सुनील गडाख, विजयराव गडाख, उदयन गडाख, माजी सभापती सुनीता गडाख, नगर उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

ठाकरेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी

याप्रसंगी उपस्थित शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे जिंदाबादच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. शनीशिंगणापूर देवस्थानच्या वतीने पूर्णत्वास येत असलेल्या पानसनाला सुशोभीकरण प्रकल्पामुळे शनी शिंगणापूरच्या वैभवात भर पडणार आहे. शनिदेवाच्या दर्शनाने मनाला आत्मिक समाधान मिळाले, असे उद्धव ठाकरे म्हणाले.