आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टिका:श्रमिक विरोधी धोरणांमुळेच देशात बेरोजगारी वाढली, डीवायएफआयचे राज्य उपाध्यक्ष गणेश दराडे

अकोले4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात मुठभर धनिकांची संपत्ती मोठ्या प्रमाणात वाढत असताना देशातील ५५ टक्के जनता दारिद्र्यात ढकलली जात आहे. कोव्हीड संसर्ग काळात आरोग्य सुविधा न मिळाल्याने लाखो नागरिकांना प्राण गमवावे लागल्याने श्रमिक व युवकांच्या मनात मोठा असंतोष आहे. तो सरकारच्या विरोधात उफाळून येऊ नये म्हणून मोदी सरकार, भाजप व आरएसएस जनतेत धर्मांधतेचे विष पेरत आहे. देशात मोदी सरकारच्या कॉर्पोरेट धार्जिण व श्रमिक विरोधी धोरणांचा परिणाम म्हणून देशात व राज्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली, असे प्रतिपादन डीवायएफआय चे राज्य उपाध्यक्ष गणेश दराडे यांनी केले.

अकोले येथे डीवायएफआयचे जिल्हास्तरीय अधिवेशन रविवारी घेण्यात आले. उद्घाटन डीवायएफआयचे राज्य उपाध्यक्ष गणेश दराडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना दराडे बोलत होते. अधिवेशनास अकोले, संगमनेर, राहुरी व इतर तालुक्यांतून मोठया संख्येवर प्रतिनिधी उपस्थित होते. एकनाथ मेंगाळ यांनी मागील तीन वर्षांचा अहवाल सादर केला. यावेळी सर्वानुमते डीवायएफआयची जिल्हास्तरीय ९ जणांची कार्यकारणी निवडण्यात आली. यात जिल्हाध्यक्षपदी एकनाथ मेंगाळ व जिल्हा सचिव पदावर गोरख आगीवले यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून गणपत मधे, सहसचिव सुरेश गिर्हे, कोषाध्यक्ष देवराम डोके, सदस्यपदी वामन मधे, भरत वळे, नाथा बहुरले, ज्ञानेश्वर वाजे हे आहेत.

अकोले, संगमनेर व राहुरी तालुक्यात युवकांवरील अन्यायाविरुद्ध आवाज उठवून रोजगार, शिक्षण, आरोग्य, दारिद्र्य, रस्ते, वीज, पाणी यासारख्या मूलभूत प्रश्नांवर संघर्ष करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष एकनाथ मेंगाळ व सहसचिव गोरख आगीवले यांनी निवडीनंतर सांगितले. आगामी काळात देश व राज्यभर युवकांच्या विविध समस्यांवर डीवायएफआय प्रश्नांची मांडणी करून त्या सोडवून घेण्याबाबद आंदोलन छेडतील असे एकनाथ मेंगाळ यांनी स्पष्ट केले. अधिवेशनात किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले, सिटू कामगार संघटनेचे सदाशिव साबळे, नामदेव भांगरे यांनी पाठिंबा दिला.

बातम्या आणखी आहेत...