आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर जिल्ह्यात मागील तीन दिवस सलग वादळी वाऱ्यासह गारपिटीने हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. रविवारी झालेल्या पावसाने नगर, राहाता, कर्जत, राहुरी, कोपरगाव व संगमनेर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने ३७०० हेक्टरवर पिकांना फटका बसला. तर यापूर्वी दोन दिवस झालेल्या पावसाने ८ हजार ३०० हेक्टर क्षेत्रावरील काढणीला आलेल्या रब्बी पिके, फळबागा व चारा पिकांचे नुकसान झाले आहे.
मागील दिवसांत सुमारे १२ हजार हेक्टरवरील पिकांना अवकाळीचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सोमवारपासून अवकाळीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.
नगर जिल्ह्यात शुक्रवार, शनिवार व रविवार असे सलग तीन दिवस जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. काही ठिकाणी गारपिट झाल्याने गहू, हरभरा, कांदा व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मागील वेळेस झालेल्या अवकाळीच्या नुकसानीची अद्याप भरपाई मिळाली नसताना त्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना कोंडीत पकडले.
आधीच शेतमालाला मातीमोल भाव मिळत असताना हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला असल्याने शेतकरी अधिकच हतबल झाले आहेत. शुक्रवारी व शनिवारी नगर, कर्जत, राहुरी, संगमनेर, कोपरगाव, पारनेर, शेवगाव, नेवासे तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला.
या पावसाने, गहू, कांदा, संत्रा, मोसंबी, इतर फळपिके व चारा पिकांचे नुकसान झाले. या दोन दिवसांत सुमारे ८ हजार ३०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. या दोन दिवसांत सुमारे १६ हजार ४०७ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सलग दोन दिवस पाऊस झाल्याने आता पाऊस थांबेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास नगर, राहाता, कर्जत, राहुरी, संगमनेर तालुक्यात पुन्हा अवकाळी पाऊस झाला. कोपरगाव तालुक्यात काही ठिकाणी गारपिटही झाली. या अवकाळी पावसाने सुमारे ३७०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.
या तालुक्यांना बसला अवकाळीचा फटका
नगर जिल्ह्यातील नगर, कर्जत, राहुरी, संगमनेर, पारनेर, नेवासे, कोपरगाव, शेवगाव, राहाता या तालुक्यात अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
रविवारी ३७०० हेक्टरील पिकांचे नुकसान
रविवारी, ९ एप्रिल रोजी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील ३७०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. नगर, कर्जत, राहाता, राहुरी, संगमनेर व काेपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका बसला, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप यांनी दिली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.