आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहवाल:अर्बन बँक : एका कर्जाची थकबाकीची रक्कम भरण्यासाठी घेतले दुसरे कर्ज ; काही संचालकही रडारवर

नगर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेच्या १५० कोटींच्या फसवणूक प्रकरणातील आरोपी सचिन गायकवाड (रा. कौडगाव, ता. श्रीगोंदे) याच्याकडे सुरू असलेल्या तपासादरम्यान कर्जाच्या रकमेतील व्यवहारांच्या महत्त्वाच्या नोंदी समोर आल्या आहेत. संचालकांशी संबंधित जवळच्या व्यक्तींची कर्ज प्रकरणे मिटवण्यासाठी अथवा एनपीएतून बाहेर काढण्यासाठी दुसरे कर्ज करून त्या रकमा संबंधित कर्ज खात्यामध्ये वळवण्यात आल्याचे तपासात समोर आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेने थेट आरबीआयकडून बँकेशी संबंधित सर्व अहवाल प्राप्त करून घेतल्यामुळे बँकेतील गैरव्यवहाराचा संपूर्ण लेखाजोगा पोलिसांच्या हाती लागला आहे. त्यामुळे बँकेच्या तत्कालीन व सध्याच्या संचालकांचे धाबे दणाणले आहेत. बँकेच्या २८ संशयास्पद कर्जखात्यांसह बँकेच्या तत्कालीन अध्यक्षांच्या जवळचे कार्यकर्ते असलेल्या सचिन गायकवाड व आशुतोष लांडगे यांनी मिळून बँकेची दीडशे कोटीची फसवणूक केल्याची तक्रार नगर अर्बन बचाव कृती समितीचे प्रमुख व बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी पोलिसात दिल्याने कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण आव्हाड करत आहेत. पोलिसांनी आरोपी सचिन गायकवाड त्याच्याशी संबंधित घृष्णेश्‍वर मिल्क व जिजाऊ मिल्क प्रॉडक्शन या कंपन्यांच्या कर्जखात्याची व बँक खात्याची तपासणी सुरू केली आहे. कर्ज घेतलेल्या रकमेचा विनियोग इतर कारणासाठी झाल्याचे यात समोर आल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. काही रकमा इतर कर्ज खात्यांमध्ये वळविण्यात आल्या आहेत. त्यामुळे संबंधित कर्ज खातेदार, संचालकांच्या जवळचे काही व्यक्ती व काही संचालकही पोलिसांच्या रडारवर आले आहेत. बनावट व्हॅल्युएशन रिपोर्ट संदर्भातही पोलिसांकडून तपास सुरू आहे. यातही काही महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.

तपासात आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता कर्जाच्या रकमेचा गैरवापर झाल्याचे बँकेतील व्यवहारांमधून समोर येत असल्याने या रकमा कुणाकडे वळविल्या गेल्या, या सर्व प्रकारांमध्ये कोणाची साथ होती, यात संचालक व अधिकाऱ्यांचा समावेश आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. २० जूनपर्यंत आरोपी गायकवाड यांना पोलिस कोठडी असल्यामुळे तपासात आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक गुन्हे शाखेने तपासाला वेग दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...