आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्रीगोंदे तहसील कार्यालय येथे सरकार व निष्क्रिय राज्यकर्ते, कारखानदार तसेच तालुक्यातील अतिशहाणे निष्क्रिय मुजोर अधिकारी यांचे डोके ठिकाण्यावर आणून, त्यांना देवा खंडेरायाने योग्य सद्बुद्धी द्यावी व झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी राजेंद्र म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली जागरण गोंधळाचा कार्यक्रम करण्यात आला.
शेतीपंपाची सक्तीची वीज बिल वसुली बंद करावी, ओल्या दुष्काळामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून ५० हजार रुपये मदत मिळावी, तालुक्यातील चारही साखर कारखान्यांनी उसाचा पहिला हप्ता किमान ३१०० रुपये द्यावा. पंचायत समिती कार्यालयात गायगोठा अनुदानासाठी शेतकऱ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवण्यात यावी, लंपी आजाराने दगावलेल्या जनावरांची नुकसान भरपाई मिळावी, जनावरांचे सर्व आठवडे बाजार सुरू करावे, या सर्व मागण्यासाठी हे अनोखे आंदोलन करण्यात आले.
यावेळी शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी नेहमीच संघर्ष करावा लागतो. दरवेळी आंदोलने करावी लागतात. मोर्चा, आंदोलने, उपोषणे करून देखील प्रशासनाला घाम फुटत नाही. म्हणून या झोपलेल्या प्रशासनाला जागा करण्याकरिता व यांना योग्य सद्बुद्धी मिळण्याकरिता आज तहसील कार्यालयासमोर देवा खंडेरायाचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम करण्याची वेळ आली.
या अनोख्या आंदोलनाची दखल घेत तहसीलदार कुलथे, गटविकास अधिकारी राम जगताप, महावितरणचे सर्व अधिकारी हे आंदोलनस्थळी उपस्थित राहिले. ट्रांसफार्मर न सोडता वसुली करू, पंचायत समितीच्या निगडित प्रश्नांसंदर्भात लवकरच आढावा बैठक घेऊ, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
...तर गाढव मोर्चा काढणार
वारंवार आंदोलने करूनही काही होत नाही. सरकारने आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. आज आंदोलन करून मांडलेले प्रश्न जर आठ दिवसांत मार्गी लागले नाहीत, तर संबंधित कार्यालयात गाढवं सोडून आंदोलन करणार असा इशारा शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के यांनी दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.