आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीएसच्या कारवाईनंतर प्रशासन सतर्क:दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी जिल्ह्यात सर्वत्र दक्षतेचे आदेश जारी ; दोन महिन्यांसाठी कलम १४४ लागू

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दहशतवादी कारवायांना प्रतिबंध घालण्यासाठी सुरक्षेचा उपाय म्हणून ‍जिल्ह्यात पुढील दोन महिन्यांसाठी कलम १४४ लागू करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी याबाबत आदेश जारी करून पोलिस यंत्रणांसह सर्वच घटकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन केले आहे. पोलिस प्रशासनाने ही सर्व पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना संशयास्पद हालचालींवर कारवाईचे आदेश दिले आहेत. मागील महिन्यात शिर्डी येथे दहशतवाद विरोधी पथकाने एका दहशतवाद्यावर केलेल्या कारवाईनंतर आगामी सण व उत्सव काळातील खबरदारीचा भाग म्हणून प्रशासन सतर्क झाल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यातील घरमालक, लॉज, सायबर कॅफे, मोबाईल सिमकार्ड विक्रेते, प्रिटिंग प्रेस, ऑफसेट चालक, विस्फोटक गोदाम परवानाधारक, भंगार विक्रेते व जुन्या वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांसाठी हे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. संशयास्पद, अनोळखी व्यक्तींची माहिती न लपविता तत्काळ पोलिस प्रशासनाला देण्यात यावी. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस यंत्रणेसह सर्व घटकांनी दक्षता घ्यावी, असे जिल्हाधिकारी भोसले यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. दहशतवादी कारवायांना प्रतिबंध करण्याबरोबरच सार्वजनिक शांतता अबाधित ठेवणे, दंगलींना प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यात फौजदारी कलम १४४ नुसार लागू करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ओळखपत्र घेऊनच भंगार विकत घ्यावे
भंगार विक्रीतील मोटारसायकलच्या वस्तू व इतर वस्तूचा उपयोग देशविघातक घातक कृत्यांसाठी झालेला आहे. त्यामुळे भंगार खरेदी-विक्री करणाऱ्या दुकानांनी माल विकत घेतांना व विक्री करतांना संबंधित व्यक्तिचे ओळखपत्र, पत्ता मोबाईल नंबरसह सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रजिस्टर ठेवून नोंद घ्यावी. तपासणी वेळी पोलिसांना ही माहिती उपलब्ध करून द्यावी, असे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान वाहन खरेदी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांनाही ग्राहकांची सर्व माहितीची नोंद ठेवावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

घरमालक, लॉज चालकांना निर्देश
जिल्ह्यातील घरमालकांनी भाडेकरूंना भाड्याने घर देतांना भाडेकरुबाबतची सर्व सविस्तर माहिती घेवून त्यांचे ओळखपत्र व फोटोसह स्थानिक पोलिस स्टेशनला द्यावी. तसेच नगर पोलिस दलाच्या वेबसाईटवर सर्व माहिती भरावी. लॉज मालकांनी सर्व ग्राहकांची माहिती ओळखपत्रासहित सर्व रेकॉर्ड दोन वर्षापर्यंत जतन करुन ठेवावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

आक्षेपार्ह वेबसाईटच्या सर्चिंगवर लक्ष ठेवा
सायबर कॅफे चालक व मालकांनी महिला व पुरुष ग्राहकांचे ओळखपत्र घेऊनच प्रवेश द्यावा. इंटरनेट वापरलेल्या कालावधीची नोंद ठेवावी. संशयीत व्यक्तीला इंटरनेट वापरासाठी देऊ नये. ग्राहक आक्षेपार्ह वेबसाईटवर सर्च करतात का, याबाबत सायबर चालकांनी लक्ष ठेवावे. आक्षेपार्ह वेबसाइट वापरण्यास, आक्षेपार्ह मजकूर टाकण्यास वेबसाईट वापर करु देऊ नये, असेही आदेशात म्हटले आहे.

आक्षेपार्ह मजकुरावर राहणार लक्ष
प्रिंटिंग प्रेस, ऑफसेट चालकांनी धार्मिक मजकूर छापताना माहिती प्रकाशित करणाऱ्या व्यक्तिचे ओळखपत्र घ्यावे. त्यात काही आक्षेपार्ह मजकूर छापला जाणार नाही, याची काळजी घ्यावी. प्रेसमध्ये छापल्या जाणाऱ्या सर्वच निमंत्रण पत्रिका, माहिती पत्रके, बॅनर, भित्ती पत्रके आदींवर प्रेसचे नाव ठळकपणे छापून मोबाईल नंबरही दर्शवावा, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.

शिर्डीतील कारवाईच्या पार्श्वभूमीवर प्रस्ताव
शिर्डी येथे पंधरा दिवसांपूर्वी दहशतवाद विरोधी पथकाने एका संशयित दहशतवाद्यास अटक केली होती. त्यानंतर या संशयित दहशतवाद्यास पंजाब पोलिसांकडे वर्ग करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात १४४ कलम लागू करण्याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षकांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता. तो प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.''
पल्लवी निर्मळ, निवासी उपजिल्हाधिकारी.

विस्फोटक गोदामांची तपासणी करावी
विस्फोटक गोदाम परवानाधारकांनी विस्फोटक, ज्वलनशील साठा ठेवणे, विक्री व खरेदी करणे आदी ठिकाणी विस्फोटक वस्तू सुरक्षित ठेवण्याची काळजी घ्यावी. देवाण-घेवाण, खरेदी-विक्री करतांना कायदेशीर नियम, अटी व शर्तीचे पालन करावे. व्यवहार झालेल्या व्यक्तींच्या ओळखीचा तपशील घ्यावा व अभिलेख अद्यावत ठेवावा. या सर्व ठिकाणी पोलिस प्रशासनामार्फत वेळोवेळी तपासणी करावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...