आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थोरातांना शह देण्याची खेळी:उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रभारी असलेल्या नगर, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद विखेंकडे

बंडू पवार । अहमदनगर8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रभारी पदाची जबाबदारी असलेल्या नगर, सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

थोरातांना शह देण्याची खेळी

नगर हा दिग्गज नेत्यांचा जिल्हा समजला जातो. संगमनेर या विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील तिसऱ्या क्रमांकाचे मंत्रीपद अर्थात महसूल मंत्रीपद बाळासाहेब थोरात यांच्याकडे होते. त्यामुळे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना शह देण्यासाठी शिंदे- फडणवीस सरकारने महसूलमंत्री पदाची जबाबदारी पुन्हा नगर जिल्ह्याकडे देत विखे यांना या पदावर बसवले आहे. आता पुन्हा नगर जिल्ह्याचे पालकत्व देत विखेंना आणखी मजबूत करण्याची खेळी खेळण्यात आली आहे.

प्रभादी पद फडणवीसांकडे होते

नगर व सोलापूर जिल्ह्याच्या प्रभारी पदाची जबाबदारी 5 एप्रिलपासून तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होती. अर्थात प्रभारी पदाची जबाबदारी घेतल्यानंतर फडणवीस यांचा एकही नगरचा दौरा झाला नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत अहमदनगरमध्ये भाजपच्या जागा कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी प्रभारी पदाची जबाबदारी घेतली. त्यानंतर आता नगर जिल्ह्याची जबाबदारी विखेंकडे सोपवण्यात आली आहे.

सोलापूरमध्ये कारखानदारांना शह देण्याचा प्रयत्न

सोलापूर मतदारसंघांमध्ये भाजपचे आठ आमदार आहेत. तर, दोन खासदार आहेत. सोलापूर हा कारखानदारांचा जिल्हा समजला जातो. त्यामुळे त्यांना शह देण्यासाठी फडणवीस यांची प्रभारी पदी नियुक्ती झाली होती. त्यांचे निकटवर्तीय असलेले विखे यांच्यावर या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी घेण्यात आली आहे. या सर्व राजकीय पार्श्वभूमीवर शनिवारी विखे यांचे सोलापूर व नगर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाली आहे.

नगर जिल्ह्याचे राजकारण

नगर जिल्ह्यात पाथर्डी- शेवगाव मतदार संघात भाजपच्या मोनिका राजळे या आमदार आहेत, श्रीगोंदे तालुक्यात भाजपचे बबनराव पाचपुते तर राहाता मतदारसंघात राधाकृष्ण विखे हे भाजपचे आमदार आहेत. उर्वरित अकोले मतदारसंघात राष्ट्रवादीचे किरण लहामटे, संगमनेर मतदारसंघात काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, श्रीरामपूर मतदारसंघात काँग्रेसचे लहू कानडे, कोपरगाव मतदार संघात राष्ट्रवादीचे आशुतोष काळे, नेवासे मतदारसंघात शिवसेना पुरस्कृत शंकरराव गडाख, कर्जत जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादीचे रोहित पवार, पारनेर मतदारसंघात राष्ट्रवादीचे निलेश लंके, नगर मतदारसंघात राष्ट्रवादीचे संग्राम जगताप आमदार आहेत.