आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:मनपाच्या कचरा डेपोला ग्रामस्थांनी ठोकले टाळे, रस्ते, लाईट, पिण्याच्या पाण्यासाठी आक्रमक, सावेडी डेपो पुन्हा सुरू करण्याची मागणी

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुरुडगाव कचरा डेपो परिसरात रस्ते व लाईटच्या सुविधा न दिल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. तसेच ग्रामस्थांना आश्वासन देऊनही पाणीपुरवठा न केल्यामुळे संतप्त ग्रामस्थ व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या कचरा गाड्या अडवून बुरुडगाव डेपोला टाळे ठोकले आहे. कचरा डेपोसाठी ग्रामपंचायतीने दिलेली ‘ना हरकत’ रद्द केल्याचे पत्रही ग्रामपंचायतीने महापालिकेला सादर केले आहे. दिवसभर डेपो बंद असल्यामुळे कचरा गाड्या तशाच परत पाठवण्यात आल्या आहेत. दरम्यान, सावेडी कचरा डेपो पुन्हा सुरू करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

महापालिकेच्या बुरुडगाव कचरा डेपो येथील सुविधा, डेपो परिसरात रस्ते, लाईटच्या सुविधा, दुतर्फा झाडे, तसेच महापालिकेकडून पाणीपुरवठा करण्याच्या अटीवर बुरुडगाव ग्रामपंचायतीने महापालिकेला कचरा डेपोसाठी ना हरकत दिली होती. बुरुडगाव येथे १०० टन क्षमतेचा प्रकल्प असून, या डेपोत १०० टन कचरा पाठवावा. उर्वरित ५० टन कचरा सावेडी डेपोमध्ये पाठवावा, अशी मागणी करण्यात आली होती. वेळोवेळी याकडे लक्ष वेधूनही महापालिकेने आश्वासनांची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे २१ मार्च रोजी या संदर्भात महापालिकेला आंदोलनाचे पत्रही दिले होते. त्याची दखल महापालिकेकडून घेण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले असून, मंगळवारी बुरुडगाव डेपोला टाळे ठोकण्यात आल्याचे सरपंच बापूसाहेब कुलट यांनी सांगितले. आंदोलनाची माहिती मिळताच नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्यासह महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख शंकर शेडाळे व अभियंता रोहिदास सातपुते यांनी ग्रामस्थांशी व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. उद्या (६ एप्रिल) यासंदर्भात महापालिकेत बैठक घेऊन विषय मार्गी लावले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र, बुरुडगावच्या ग्रामस्थांनी आंदोलनाची भूमिका कायम ठेवत कचरा डेपो उघडणार नसल्याचे स्पष्ट केले. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी महापालिकेत बैठकीला येणार नाहीत. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी बुरुडगावला येऊन तेथील ग्रामस्थांसमोर बैठक घ्यावी, असे या वेळी स्पष्ट करण्यात आले.

यावेळी सरपंच बापूसाहेब कुलट, उपसरपंच सिराज शेख खंडू काळे, दिलीप पाचारणे, किशोर कर्डीले, राजू क्षेत्रे, महेश निमसे, पांडू जाधव, अक्षय चव्हाण, जालिंदर वाघ, विजय कदम, संजय फुलारे, संभाजी जाधव, उमेश कुलट, नितीन जाधव, मोहन काळे, संकेत तारडे आदी उपस्थित होते. दरम्यान, ग्रामस्थांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे शहरात कचरा कोंडी निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

बातम्या आणखी आहेत...