आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:शिर्डीत 240 दिवसांत 65 लाख भाविकांकडून साईबाबांचे दर्शन; 207 कोटी रकमेसह 17 किलो सोने दान

शिर्डी | नवनाथ दिघे13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर ७ ऑक्टोबर २०२१ पासून साईबाबा समाधी मंदिर खुले झाल्यापासून २४० दिवसांत ६५ लाख भाविकांनी दर्शन घेत साईबाबांच्या झोळीत तब्बल २०७ कोटी १८ लाख ७६ हजार ५०० रुपयांचे दान दिले आहे. या दानातून भाविकांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असून त्यासाठी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी घेतलेल्या पुढाकाराचेही भाविकांमधून स्वागत होत आहे.

१७५० रुग्णांवर मोफत उपचार, ११.२९ लाख खर्च
जीवनदायी योजनेंतर्गत १७५० रुग्णांनी संस्थानच्या मोफत रुग्णसेवेचा लाभ घेतला. त्यासाठी १३ कोटी ११ लाख २९ हजार ९०२ एवढा खर्च आला.

भाविकांची संख्या अशी
-ऑनलाइन पेड पास घेतलेले: ८ लाख ७१ हजार ५०३
-ऑनलाइन फ्री पास घेतलेले : ५ लाख ६८ हजार ८१५
-पेड पास काढून दर्शन : ४ लाख ८० हजार ५९४
-दर्शनरांगेतून दर्शन : ४५ लाख

शैक्षणिक संकुल, दर्शनरांगेचे काम प्रगतिपथावर
साईबाबा समाधी शताब्दी वर्षात पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या १०९ कोटींच्या अत्याधुनिक दर्शनरांग आणि २१८ कोटींच्या शैक्षणिक संकुलाचे काम अंतिम टप्प्यात. दर्शनरांग प्रकल्पात भाविकांसाठी विविध सुविधा असून देशातील सर्वात अत्याधुनिक हा प्रकल्प ठरणार आहे.

आणखी सुविधा देण्याचा संस्थानचा प्रयत्न
^साईबाबांच्या रुग्णसेवेचा वसा जपून रुग्णांना अत्याधुनिक आणि तत्काळ आरोग्य सुविधा दिल्या जात आहेत. भाविकांना पिण्याचे स्वच्छ पाणी, निवासासाठी अद्ययावत भक्तनिवास आणि भोजन प्रसादालय असून भाविकांना लाडू प्रसाद उपलब्ध करून देण्यात आला आहे. शहर स्वच्छतेसाठी व पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी संस्थानचे मोठे योगदान आहे. भविष्यात भाविकांसाठी आणखी पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे.
भाग्यश्री बानायत, मुख्य कार्यकारी अधिकारी, साई संस्थान

बातम्या आणखी आहेत...