आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कामधेनू अगस्ति साखर कारखान्यासाठी १७ जुलै रोजी मतदान घेण्यात येणार असल्याबद्दलची विश्वसनीय माहिती हाती आली आहे. तर मतदानानंतर १८ जुलै रोजी नवीन २१ जणांचे संचालक मंडळ अस्तित्वात येणार आहे. यापूर्वीच्या संचालक मंडळात एकूण १९ संचालक होते. मात्र दोन वर्षांपूर्वी अगस्तिच्या गाळप क्षमतेत २५०० वरून ३५०० मेट्रिक टनाची वाढ केल्याने कोतूळ व देवठाण गटातून २ संचालकांची वाढ झाल्याने आता संचालकांची संख्या २१ झाली आहे. एकूण ५ गटातून ही निवडणूक होईल. पैकी अकोले गटातील १० गावांत १२०१, इंदोरी गटात ३० गावांतून १८७६ मतदार, आगर गटातील ३० गावांतून १९२८ मतदार, कोतूळ गटातून सर्वाधिक ६० गावे १९९६ मतदार आहेत. तर देवठाण गटात एकूण २५ गावांचा अंतर्भाव असून १३४१ मतदार आहेत. असे एकूण ८३४२ मतदारांवर भावी संचालकांची मदार राहील. कारण मागील पंचवार्षिक निवडणुकीत उत्पादक व अनुत्पादक सर्वच सभासदांना मतदानाचा अधिकार होता. मागील पंचवार्षिक निवडणुकीत सुमारे ३२ हजार सभासदांमधून सुमारे १८ हजार ५०० सभासद मतदानास पात्र होते. पण १७ जुलैस होऊ घातलेल्या निवडणुकीत फक्त ८ हजार ३४२ सभासदच मतदार म्हणून पात्र आहेत. यात सुमारे ३ हजार ३०० आदिवासी शेतकरी मतदार असून उर्वरीत बिगर आदिवासी ऊस उत्पादक सभासद आहेत. ही संख्या पूर्वी ११ हजारांहून अधिक होती. नविन संचालक मंडळाची निवडणूकीत १४ ते २० जूनपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत असून २१ जून रोजी सकाळी ११ वाजता नामनिर्देशनपत्रांची छाननी होऊन २२ जून सकाळी ११ वाजता पात्र उमेदवारांची यादी जाहीर येईल. माघारीसाठी २२ जून ते ६ जुलैपर्यंत मुदत राहणार असून ७ जुलैला उमेदवार अंतिम यादी प्रसिद्ध होईल. संचालक मंडळावर एकूण २१ उमेदवार निवडून द्यायचे आहेत. उत्पादक पाच गटातून प्रत्येकी तीन असे १५ संचालक पाठवायचे आहेत. सोसायटी व संस्था मतदार संघ, अनुसूचित जाती जमाती मतदार संघ, भटक्या विमुक्त जाती जमाती मतदार संघ, इतर मागास प्रवर्ग यातून प्रत्येकी १ व महिला राखीव मतदारसंघातून २ असे ६ सदस्य निवडून द्यायचे आहेत. भावी संचालक मंडळात आपला नंबर मधुकर पिचड पितापुत्रांकडून की सीताराम गायकर व आमदार डॉ.किरण लहामटे यांच्याकडून लागू शकेल, या द्विधा मनःस्थितीत अनेक कार्यकर्ते गुरफटलेले आहेत. जर निवडणूक बिनविरोध होणार असेल तर काय भूमिका घ्यावी ? या चक्रातही काही काठावरील पुढारी अडकले आहेत. गायकर यांच्याविरोधात वर्षभर तालुका पिंजून काढलेले व व्यवस्था परिवर्तनासाठी आघाडीवर राहिलेल्या नेत्यांसोबत बेरजेचे राजकारण म्हणून गायकर विरोधक जमवून घेताना दिसत आहेत. पिंपळगावखांड प्रकल्पातून जवळेबाभळेश्वर ११ गाव सामुदायिक नळपाणी योजनेस विरोध करताना लाभक्षेत्रातील गावांतून आक्रोश आंदोलनात असे काही लोक आक्रमक होताना दिसत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.