आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोना महामारीमुळे आमच्या व्यवसायाचे व कुटूंबाचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे नगर अर्बन बँकेतील करंट व सेव्हींग खात्यातील आमच्या देय व जमा रक्कम मिळणे गरजेचे आहे. त्या मिळाल्या नाही तर आमच्यावर व आमच्या कुटूंबीयांवर आत्महत्या करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय राहिलेला नाही, असे म्हणत रकमा मिळण्यासाठी ५ जुलैपासून बँकेच्या मुख्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे. त्यांची सुमारे १० कोटींची रक्कम या खात्यांत अडकून पडली आहे.
कर्जतमधील महेश सूर्यकांत जेवरे व काही व्यापाऱ्यांनी नगर अर्बन बँकेच्या अध्यक्षांना पत्र दिले आहे. रिझर्व्ह बँकेने नगर अर्बनवर निर्बंध लावल्याने करंट व सेव्हींग खात्यातून सहा महिन्यातून एकदाच व तेही १० हजारापर्यंतचीच रक्कम काढता येते. कर्जत मधील व्यापार्यांची लाखो रुपयांची अशी रक्कम त्यांच्या या बँकेतील करंट व सेव्हींग खात्यात पडून आहे.
या खात्यांवरील व्यवहार बँकेने निर्बंधांमुळे बंद केल्याने या व्यापाऱ्यांना या खात्यात पडून असलेली रक्कम वापरता येत नाही. महेश जेवरे यांच्यासह अतुल कोठारी, प्रफुल्ल नेवसे, अशोक सुपेकर, कल्याण काळे, रविकिरण नेवसे, प्रतापकुमार शहा, महादेव जगताप, भीमराव काळे, ताराबाई जगताप, देवदत्त जगताप, प्रसाद शहा, नानासाहेब शिंदे, चेनसुख पितळे, सुनील कोठारी, बाबालाल कोठारी, कल्पेश कोठारी, सुनील भालेराव, संदीपान सुपेकर आदींसह अन्य काही व्यापार्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा उपनिबंधक कार्यालयात याबाबत निवेदन दिले आहे.
बँकेतील आम्हा खातेदारांची बँकेत जमा असलेली रक्कम ५ जुलैपर्यंत देऊन रितसर पावती घ्यावी. अन्यथा आम्ही ५ जुलैला मुख्य शाखेसमोर आमरण उपोषणास बसणार आहोत, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.