आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील गुलमोहर रोड परिसरात ओढा बुजवून प्लॉट पाडण्यात आल्याने या ओढ्यातून वाहणारे पाणी मॉर्डन कॉलनीतील घरांमध्ये घुसते. तसेच या पाण्याबरोबर साप, विंचू असे घरात येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ओढ्याचे, ड्रेनेजचे घाण पाणीही घरात घुसत असल्याने महापालिकेने याबाबत गांभीर्याने दखल घेऊन ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी नगरसेवक योगीराज गाडे यांनी केली आहे.
मॉर्डन कॉलनी जवळून जाणाऱ्या ओढ्यात मुरूम व दगड टाकून प्लॉट पाडण्यात आले आहेत. त्यामुळे ओढा पूर्णपणे बंद झाला आहे. याबाबत तेथील नागरिकांनी महापालिकेकडे यापूर्वीच तक्रारी केल्या आहेत. मात्र, प्रशासनाने त्याची अद्याप दखल घेतलेली नाही. त्यामुळे नगरसेवक गाडे यांनी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन विभागाचे कर्मचारी अर्जुन जाधव, रिजवान शेख, सुनील महाजन यांच्यासह परिसराची पाहणी केली.
हा ओढा बुजवला आहे. पावसाळ्यात या ओढ्यातून वाहून जाणारे पाणी कॉलनीत घुसण्याची शक्यता आहे. आत्ताही ओढ्यातून वाहणारे पाणी व ड्रेनेजचे घाण पाणी घरात घुसते. अनेक सरपटणारे प्राणी आणि कीटक घरात येतात. त्यामुळे लहान मुलांना खेळताना धोका निर्माण झाला आहे. याबाबत केलेल्या तक्रारीकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.
रस्ते पुन्हा खोदून विद्रुपीकरण
महापालिका प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नव्याने रस्ते तयार केले. ते रस्ते पुन्हा खोदून रस्त्याचे विद्रुपीकरण केले जात आहे. प्रशासनाने पावसाळा सुरू होण्यापूर्वी ओढ्याचे पाणी कॉलनीत घरात घुसणार नाही, यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात.''
योगीराज गाडे, नगरसेवक.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.