आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी पुरवठा:तांदुळवाडी,कोंढवड व शिलेगाव परिसरात स्वखर्चातून पाणी पुरवठा

राहुरी8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारागाव नांदूर व इतर १४ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची मुळा नदीपात्रातील पाइपलाइन वाहून गेल्याने तांदुळवाडी,कोंढवड व शिलेगाव परिसरात विराज धसाळ यांनी स्वखर्चातून पाण्याचा पुरवठा सुरू केला आहे.

मुळा नदीपात्रातील वाळुचा अमर्याद उपशामुळे १० सप्टेंबरला बारागाव नांदूर व इतर १४ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन फुटल्याने ७० हजार लोकसंख्या असलेल्या पुर्व भागातील १४ गावात पाण्याचा पुरवठा बंद झाला होता. धरणातून मुळा नदीपात्रात सुरू असलेला पाण्याचा विसर्ग कमी झाल्याशिवाय पाइपलाइन जोडणी काम दुरूस्तीवर मर्यादा आल्या होत्या. दरम्यान, १७ सप्टेंबरला पाणी योजनेचे मुळा नदीपात्रातील ३ पाइप वाहून गेल्याने पाणी पुरवठा सुरळीत होण्याचा प्रयत्न लांबणीवर पडला आहे.

पाणी पुरवठा बंद झाल्याने पूर्व भागातील गावकऱ्यांची पाण्याच्या शोधार्थ गेल्या पंधरवाड्यापासून भटकंती सुरू आहे. पूर्व भागातील बहुतांशी ग्रामस्थ पाण्यासाठी मिळेल त्या साधनाने राहुरीत दाखल होत आहेत. तांदुळवाडी, कोंढवड, शिलेगाव व परिसरात धसाळ यांनी स्वखर्चातून पाणी टँकर उपलब्ध करून दिल्याने गावकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. बारागाव नांदूर योजनेची पाइपलाइन जोडणीसाठी कारागिरांकडून घटनास्थळाची नुकतीच पाहणी झालेली आहे. मात्र मुळा नदीपात्रात सुरू असलेला पाण्याचा विसर्ग तसेच पाइपलाइन खाली भराव टाकल्याशिवाय जोडणीचे काम शक्य नसल्याचा निर्वाळा या पथकाने दिला.