आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआज आपण मातीची काळजी घेतली तरच उद्याचे जीवन नीटपणे जगू शकतो. मातीचा कस व सेंद्रीय कर्ब घसरत जाणे चिंतेची बाब आहे. पाण्याचा अतिरिक्त व रासायनिक निविष्ठांच्या भरमसाठ वापराने जमीन खराब होऊन सेंद्रिय कर्ब व आम्ल-विम्ल निर्देशांक बिघडलेत. यापूर्वी एकरी १०० टन उस उत्पन्न काढणाऱ्या शेतकऱ्यांना आता १५ टन उत्पादन घेणे कठीण होतय. आपण मातीचे आरोग्य जपले तरच माती आपल्यालाही जगवेल, असे आवाहन बाभळेश्वर कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संभाजी नालकर यांनी केले.
अकोले तालुक्यातील आदिवासीबहुल चिचोंडी येथे मुंबई येथील एएसके फाउंडेशन, बायफ संस्था संचलित समृद्ध किसान प्रकल्प व जनरल मिल्स पुरस्कृत आदिवासी विकास प्रकल्प आणि बाभळेश्वर येथील कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या मृदा परीक्षण आणि मृदा आरोग्य जागृती कर्यक्रमात डॉ. नालकर मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर मृदा शास्त्रज्ञ एस. एस. सोनवणे उपस्थित होते.
याप्रसंगी ज्येष्ठ मृदा शास्त्रज्ञ एस. एस. सोनवणे म्हणाले, जमिनीचा पोत सांभाळत सेंद्रिय कर्ब अबाधित राखणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. यामुळेच काही परंपरागत गोष्टींना सोबत घेऊन पुन्हा एकदा शाश्वत शेतीकडे वळावे लागणार आहे. त्यासाठी एकात्मिक शेती पद्धतीत शेळी, मेंढी, कोंबडी आदी पाळीव प्राणीयांचे मोठे महत्व आहे. यांच्याशिवाय जमीन सुपीक ठेवणे अवघड आहे. पाळीव प्राण्यांच्या मलमूत्रातून निर्माण होणारे कंपोस्ट खत म्हणजेच शेतीसाठी संजीवनी ठरेल.
जमिनीचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या निविष्ठांना फाटा देत घरच्याघरी निविष्ठा बनवण्याचे तंत्र अवगत करावे. जीवामृत, बीजामृत, गांडूळ खत, गांडूळ पाणी, हिरवळीचे खते, पिकांची फेरपालट, हवेतील नत्र शोषून करणाऱ्या पिकांच्या लागवडीसारखे तंत्र शेतकऱ्यांनी अवलंबावे, असेही आवाहन मृदा शास्त्रज्ञ सोनवणे यांनी केले. आदिवासी बांधवांनी अबाधित राखलेल्या जंगलामुळे या भागात जमिनींचा पोत अद्याप टिकून आहे. विपुल जंगल सपत्तीतून आवश्यक अन्नद्रव्य निसर्गनिर्मित कंपोस्ट खतातून पिकांना उपलब्ध होतात.
त्यामुळेच जमिनीत मुबलक जीवाणू अस्तित्वात राहतात. त्यातूनच इथली शेती उत्पादने दर्जेदार व रोगराई व किडींना कमी बळी पडतात. अशा शेतमालाला बाजारात भाव अधिक मिळेल, अशी माहिती जितीन साठे यांनी दिली. सुत्रसंचलन राम कोतवाल यांनी केले. बायफचे प्रकल्प समन्वयक विष्णू चोखंडे, शुभम नवले, राम कोतवाल, मच्छिंद्र मुंडे, किरण आव्हाड, गोरख देशमुख, सुनील मधे यांनी कार्यक्रम यशस्वी केला.
..तर कसण्यायोग्य जमीन उरणार नाही
आधुनिकीकरणामुळे शेती करण्याच्या पद्धती बदलल्या व पशुधन कमी होत गेले. शेतीत रासायनिक निविष्ठांचा अतिवापर झाला. त्यातूनच पंजाब व हरियाणा सारखी राज्य आज जमिनीचे आरोग्य गमावून बसलेत. आपण वेळीच सावध झालो नाही तर पुढील पिढीसाठी कसण्यायोग्य जमीन उरणार नाही, असे ज्येष्ठ मृदा शास्त्रज्ञ सोनवणे म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.