आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:ते परत निवडून येणार नाही, यासाठी आम्ही सक्रीय राहू ; सुनील शिंदे यांचा इशारा

नगर5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिवसेनेतून मुख्यमंत्री शिंदे गटात प्रवेश केला असला, तरी ते कोणाचे अपयश म्हणता येणार नाही. ते एकटेच गेलेले नाहीत तर १२ जणांनी तशी भूमिका जाहीर केली आहे. पण जे तिकडे गेले, ते परत येथून निवडून येणार नाही व त्यासाठी आम्ही सक्रिय राहू, असा इशारा नगर शिवसेनेचे नवे संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे यांनी दिला.

भाऊ कोरगावकर यांच्याविषयी नगर शहर व दक्षिणेतील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या तक्रारी असल्याने पक्षाने त्यांची उचलबांगडी केली. त्यांच्या जागी विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी बुधवारी दक्षिण नगर जिल्ह्यातील नगर शहर, श्रीगोंदे, पारनेर, कर्जत, जामखेड, पाथर्डी, शेवगाव व नगर तालुक्यातील पदाधिकारी, नगरसेवक तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांशी संवाद साधला.

जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे, रावसाहेब खेवरे, राजेंद्र दळवी, शहर प्रमुख संभाजी कदम यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी महापौर रोहिणी शेंडगे, मनपा महिला व बालकल्याण समिती सभापती पुष्पा बोरुडे, युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड, उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव, युवा सेनेचे हषवर्धन कोतकर, रवी वाकळे आदींसह सर्व नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.नगर उत्तर जिल्ह्याचे नवे संपर्क प्रमुख व माजी मंत्री बबनराव घोलप यांनी शिर्डीतून स्वतःची उमेदवारी जाहीर केलेली नाही, तर फक्त उमेदवारीची इच्छा प्रदर्शित केली आहे. त्यासाठी ते पात्रही आहेत. त्यामुळे त्यांनी लढण्याची इच्छा मनात ठेवली तर ते गैर नाही. शेवटी उमेदवारीचा निर्णय पक्ष प्रमुखच घेणार आहेत, असे आमदार शिंदे यांनी स्पष्ट केले.

शिंदे साहेब नको.. फक्त सुनीलजी म्हणा.. नवे संपर्क प्रमुख आमदार शिंदे यांचे स्वागत करताना जिल्हाप्रमुख गाडे यांनी दोनदा त्यांचा शिंदे साहेब म्हणून उल्लेख केला. पण सेनेतून बाहेर पडलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही शिंदे साहेबच म्हटले जात असल्याने तुम्हाला सुनील शिंदे साहेब म्हणतो, असे गाडे म्हणताच फक्त सुनीलजी म्हणा, असा मध्यममार्ग खुद्द आमदार शिंदे यांनीच काढला. यावरून उपस्थितांमध्ये हशा पिकला.

खात्री केल्याशिवाय यावर बोलणार नाही
नगर शहरातून काही नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला समर्थन दिले आहे. यावर मत व्यक्त करताना आमदार शिंदे म्हणाले की, राज्यभरात गोंधळ सुरू आहे. त्यामुळे त्यांची बंडखोरी आहे की नाही, हे आता सांगता येणार नाही. एखाद्याला भेटणे व त्याच्याशी सक्रियता-क्रियाशीलता यात फरक असतो. कारवाईचा अधिकार पक्ष प्रमुखांना असतो, त्यामुळे खात्री केल्याशिवाय यावर बोलणार नाही. त्यांच्याशी बोलून ते शिवसेनेत थांबतात काय, याबाबत प्रयत्न करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...