आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादुधाला एफआरपीचे संरक्षण मिळावे, यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मंत्री समितीने शेतकरी प्रतिनिधीचे म्हणणे समजून घेऊन याबाबत आपला अहवाल तयार करावा, असे निवेदन करण्यासाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या प्रतिनिधी मंडळाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देवगिरी येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
पाऊण तास चर्चा
उपमुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाबरोबर पाऊण तास चर्चा केली व दूध एफआरपीबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी राज्यातील शेतकरी प्रतिनिधी यांच्याशी चर्चा केली जाईल. तसेच दूध उत्पादकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिक सकारात्मक प्रतिसाद दिला जाईल, असे आश्वासन दिले.
दूध उत्पादक अस्वस्थ
दूध खरेदीदराच्या अस्थिरतेमुळे राज्यात दूध उत्पादक शेतकरी अस्वस्थ आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर दूध पावडरचे दर नैसर्गिक आपत्तीमुळे पडल्याने दूध उत्पादकांना वारंवार संकटाचा सामना करावा लागतो. दूध क्षेत्रातील ही अनिश्चितता संपवण्यासाठी व दुधाला किमान आधारभाव मिळावा, यासाठी दुधाला एफआरपीचे संरक्षण लागू करावे व दूध तसेच दुग्धपदार्थांच्या निर्मिती व विक्रीमध्ये तयार होणाऱ्या नफ्यात शेतकरी कुटुंबाला रास्त वाटा मिळावा, यासाठी दूध क्षेत्राला रेव्हेन्यू शेअरींगचे धोरण लागू करावे, यासह प्रमुख मागण्यांसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती सातत्याने संघर्ष करत आहे. संघर्ष व आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दुधाला एफआरपी लागू करण्याबाबत अभ्यास करण्यासाठी मंत्रिगटाची नियुक्ती केली आहे. मंत्रिगटाने याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन दूध उत्पादकांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे.
उत्पादकांना न्याय द्यावा
शिवाय मिल्को मीटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांची होणारी लूटमार थांबवावी, दुधातील भेसळ बंद करण्याबाबत ठोस पावले टाकली जावीत, राज्यात दुग्धमूल्य आयोगाची स्थापना करुन दूध उत्पादकांना न्याय द्यावा, पशुखाद्याच्या गुणवत्ता नियंत्रणाबाबत धोरण घेतले जावे, दूध क्षेत्रात काम करणाऱ्या सहकारी दूध संघांना संरक्षण देऊन सहकार मजबूत करण्यासाठी अधिक गांभीर्यपूर्वक धोरणे घेतली जावीत, खासगी कंपन्यांच्या लुटमारीच्या विरोधामध्ये कायदा करावा, यासह नऊ मागण्यांचे निवेदन यावेळी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे राज्य समन्वयक डॉ. अजित नवले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले. दूध प्रश्नांचे अभ्यासक सतीश देशमुख व दूध उत्पादक शेतकरी खंडूबाबा वाकचौरे हे यावेळी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.