आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मोहटागड’:‘भगवानगड’ साद घालणार की ‘मोहटागड’ निर्णयासाठी बळ देणार? ; नाराज असल्याच्या बातम्या

नगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यसभेचे पाठोपाठ विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी डावलल्यानंतर आपल्याच पक्षावर प्रचंड नाराज असलेल्या भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे मंगळवारी पाथर्डी तालुक्यातील मोहटा गडावर देवीच्या दर्शनासाठी येणार आहेत. तालुक्यातील भगवानगड हे तसं मुंडे परिवारासाठी शक्तिस्थळ. परंतु ‘कोणता झेंडा घेऊ हाती’, अशी मनाची संभ्रमावस्था असताना पाथर्डीत येऊन त्या भगवान गडावर भगवान बाबांचे दर्शन घेण्याऐवजी मोहटा देवीच्या दर्शनासाठी जाणार असल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

बीड आणि नगर जिल्ह्यातील पाथर्डी शेवगाव परिसरातील ऊस तोडणी कामगारांचं राज्यस्तरीय नेतृत्व करणारे, बहुजनांसाठी आधार असणारे गोपीनाथराव मुंडे यांच्यासाठी भगवानगड हे एक प्रेरणास्थळ होतं. त्यांच्या आयुष्यातील बहुतांश निर्णय त्यांनी भगवान गडावरच घोषित केले होते. समाजासाठी देखील हे शक्तिस्थळ असल्याने दर वर्षी दसरा मेळाव्याला गोपीनाथ मुंडे यांच्या मुखातून नवी घोषणा ऐकण्यासाठी राज्यातील जनता मोठ्या संख्येने भगवान गडावर धाव घेत होती. त्यांच्या अकाली निधनानंतर ही प्रथा परंपरा काही वर्षांनी खंडित झाली आणि आता बीड जिल्ह्यात गोपीनाथगड नव्याने प्रेरणास्थळ म्हणून आकाराला आला. भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यात उद्भवलेल्या काही वादाच्या प्रसंगानंतर ‘भगवानगडावर कोणताही राजकीय मेळावा होऊ नये’,असा मेळावा घ्यायचा असेल तर तो गडाच्या पायथ्याशीच घ्यावा’, असा निर्णय झाला. त्यामुळे गडावरील दसरा मेळावा बंद झाला. त्यावरूनही बरंच मोठं राजकारण महाराष्ट्रात रंगलं होतं. आणि आता हे दसरा मेळावे गोपीनाथ गडावरुन साजरे होतात.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यात गेल्या काही वर्षांपासून शीतयुद्ध सुरू आहे. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात जलसंधारण मंत्री म्हणून दुसऱ्या क्रमांकाचं मंत्रिपद पंकजा मुंडे भूषवित होत्या. परंतु जेव्हा जेव्हा अशा मेळाव्यातून भाषण करण्याची संधी त्यांना मिळेल त्या वेळी ‘मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे’, असं त्या आवर्जून सांगत होत्या. तिथूनच पुढे या दोन्ही नेतृत्वामध्ये दुरावा निर्माण झाला. कालांतराने पंकजा मुंडे यांचे विश्वासू राम शिंदे यांना अचानक जलसंधारण मंत्रालयाचा पदभार देऊन कॅबिनेटमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळालं. त्यावरूनही बरीच सुंदोपसुंदी भाजपच्या नेतृत्वामध्ये माजलेली पाहायला मिळाली.

विधानसभेच्या मागच्या निवडणुकीत परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केल्यानंतर भाजपने त्यांचं पुनर्वसन केलेलं नाही. त्यामुळे त्यांच्या मनातील खदखद वाढतच गेली. त्या केंद्रीय नेत्या आहेत असं म्हणत त्यांना राज्यसभा आणि आता विधान परिषदेसाठीही डावलण्यात आले. त्यावरून त्या स्वतः दाखवत नसल्या तरी त्यांची देहबोली मात्र त्या पक्षावर प्रचंड चिडलेल्या आहेत, असेच दाखविते आहे. त्यामुळे पाथर्डी येथे येऊन त्या आपल्या कार्यकर्त्यांचशी नेमका काय संवाद साधतात? आणि कोणतं सूचक वक्तव्य करतात की थेट घोषणाच करतात? याची उत्सुकता ताणली गेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मौन सोडण्यासाठी त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याप्रमाणेच पाथर्डीची निवड केली खरी परंतु भगवानगडावर न जाता मोहटा गडावरून त्या नेमका कोणता संदेश देऊ इच्छितात याची उत्सुकता आहे. एकंदरीतच पंकजा मुंडे यांचा हा पाथर्डी दौरा विविध कारणांनी गाजवण्याची दाट शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...