आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लालफीत:जलसंपदा विभागावरील पुणेकरांची मक्तेदारी विखे मोडून काढणार का; स्मरण विखेंनी उपमुख्यमंत्र्याना करून देण्याची जनतेची मागणी

जितेंद्र निकम |नगर तालुका23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जलसंपदा खात्यावर पुणेकरांची कायम मक्तेदारी राहिली आहे. त्यामुळेच आजमितीला कुकडी प्रकल्पात ४.९६ टीएमसी पाणी उपलब्ध असतानाही वेळोवेळी विधानसभेत जलसंपदा खात्याने पाणी शिल्लक नसल्याची चुकीची माहिती देत सभागृहाची कायम फसवणूक केली. परिणामी नगर जिल्ह्यातील साकळाई सारखी योजना २५ वर्षांपासून रखडली. ही मक्तेदारी मोडून काढावी आणि वाळकी ता. नगर येथे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साकळाई योजनेला मंजुरी देऊ या घोषणेची आठवण करून देत साकळाई तातडीने मंजूर करावी, अशी मागणी नगर व श्रीगोंदे तालुक्यातून होत आहे.

नगर- श्रीगोंदे तालुक्यातील जिरायत भागाला वरदान ठरणाऱ्या साकळाई योजनेची १९९६ पासून चर्चाच सुरू आहे. प्रत्येक विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत साकळाईचा प्रश्न ऐरणीवर येतो. सर्वच राजकीय नेत्यांकडून आश्वासनांची खैरात होते पण पुढे त्यावर कार्यवाही होत नाही हा आजवरचा अनुभव आहे. साकळाई बाबत काही आमदारांनी विधानसभेत प्रश्नही उपस्थित केलेही पण पाणी शिल्लक नाही या जलसंपदा खात्याच्या उत्तरानंतर ते शांत झाले किंबहूना पुणेकरांच्या दबावाखातर त्यांनी गप्प राहणेच पसंत केले. पाणी उपलब्ध नसतानाही ते उपलब्ध करत राज्यातील अनेक योजना साकळाई नंतर येत मंजूरही झाल्या पण साकळाई नगर- श्रीगोंदयातील शेतकऱ्यांसाठी मृगजळच बनून राहिली.पुणेकरांच्या दबाबाखाली नगर- श्रीगोंदे मधील कोणताही राजकीय नेता साकळाईला पाणी कसे उपलब्ध करता येईल, कुकडी प्रकल्पात खरच पाणी शिल्लक आहे किंवा नाही, पाणी वाटप कसे करण्यात आले आहे, खरच जलसंपदा खाते खरी माहिती देत आहे किंवा नाही याखोलात ते गेले नाहीत. इच्छाशक्ती दाखवत पाठपुरावा करताना दिसले नाहीत त्यामुळे जलसंपदा खात्याची नकारघंटा गेली २५ वर्षे वाजत राहिली.

जलसंपदा खात्यावरील पुणेकरांच्या मक्तेदारीमुळे आणि राजकीय दबावामुळे जलसंपदा खात्याने कायम पुणे धार्जिण भूमिका घेतली आहे.ही मक्तेदारी मोडुन काढण्याची राजकीय इच्छाशक्ती विखे पितापुत्रांनी दाखवावी, तसेच १६ एप्रिल २०१९ च्या वाळकी येथील सभेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साकळाई योजनेला तातडीने मंजुरी देऊ या दिलेल्या शब्दाची आठवण उपमुख्यमंत्री फडणवीस यांना करून द्यावी, अशी मागणी मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे.आजमितीला जलसंपदा खाते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीत आहे त्यामुळे विखे पिता पुत्रांनी इच्छाशक्ती आणि आपली राजकीय ताकत वापरल्यास साकळाई चे पाणी मृगजळ न रहाता शेतकऱ्यांनाच्या शेतात दिसू शकेल.

फसवेगिरीबाबत संताप
२६ जून २०२२ रोजी गोपनीयरित्या ४.९६ टीएमसी पाणी शिल्लक असल्याचे महाविकास आघाडी सरकारला कळवले. त्यातून पुणे जिल्ह्यातील ६५ बंधाऱ्यांसाठी २.५५ टीएमसी पाणी देता येईल, असा अहवाल जलसंपदाने दिला.त्यावर मविआने ६५ बंधाऱ्यांना पाणी मंजुरीला मंजुरीही दिली. २५ वर्षांपासून मागणी असणाऱ्या साकळाईसाठी जलसंपदा कडे पाणी नाही आणि पुण्यातील ६५ अनधिकृत बंधाऱ्यांसाठी पाणी आहे, या जलसंपदा खात्याच्या भूमिकेबाबत नगर जिल्ह्यातून संताप व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...