आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खबरदारी:पहाटेची अजान भोंग्याविनाच; इतरवेळचा आवाज कमी, शहरात 3 ठिकाणी लावलेले भोंगे पोलिसांनी केले बंद, शहरात मोठा पोलिस बंदोबस्त

नगर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनसेने पुकारलेल्या आंदोलनानंतर नगर शहरात पहाटेची फजर अजान भोंग्याविनाच पार पडली. नगर शहर व परिसरातील तीन पोलिस ठाण्याच्या हद्दीत ९९ पैकी केवळ ३ मशिदीमध्येच पहाटे भोंगे वाजले, तेही बंदोबस्तावरील पोलिसांनी तत्काळ बंद केले. दिवसा इतर वेळेतही काही तुरळक मशिदींकडून अत्यंत कमी आवाजात भोंग्यावर अजान देण्यात आली. दरम्यान, दिवसभरात मनसेकडून कोणतेही आंदोलन झाले नाही. पोलिसांकडूनही कुणावर कारवाई झाल्याची नोंद नाही.

मनसेच्या भोंग्यासंदर्भातील इशाऱ्यानंतर राज्यभर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. नगर शहरातही या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काहीसा तणाव होता. जिल्हा पोलिस दलाने यासाठी कठोर पावले उचलत मनसेच्या दहा ते बारा पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या होत्या. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार पहाटे सहा वाजण्यापूर्वी भोंगे लावू नयेत, अशा सूचना देण्यात आला होत्या. मंदिरांच्या ट्रस्टींनाही यासंदर्भात सूचना देण्यात आलेल्या होत्या.

पोलिसांनी केलेल्या आवाहनानुसार सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांचे पालन करत तीन मशिदी वगळता उर्वरित सर्व मशिदीमध्ये पहाटेची अजान भोंग्याविनाच पार पडली. मंदिरांवरील भोंगेही बंद ठेवण्यात आले होते. झेंडीगेट परिसरातील तीन मशिदीमध्ये पहाटे भोंगे लावण्यात आले होते. मात्र, बंदोबस्तावरील पोलिसांनी तत्काळ सूचना देऊन भोंगे बंद केले. हडको येथील एका मंदिरामध्ये पहाटे हनुमान चालिसा लावण्यात आली होती. तोफखाना पोलिसांनी ती बंद केली.

बातम्या आणखी आहेत...