आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरमध्ये ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन:विकासकामांद्वारे गोरगरीब, सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी काम; बाळासाहेब थोरातांचे प्रतिपादन

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वाडी वस्तीवरील गोरगरीबांच्या जीवनात आनंद निर्माण करणे व त्यांच्या जीवनात समृद्धी निर्माण करण्यासाठीच अविश्रांत काम केले आहे. चांगल्या कामामुळे संगमनेर तालुक्याचा राज्यभरात लौकिक आहे. प्रत्येक गावात विकासाच्या विविध योजना राबवल्या आहेत. तालुक्यातील गोरगरीब, सर्वसामान्य जनतेचे जीवनमान उंचावणे यासाठीच काम होत आहे. तालुक्यात विकासकामांचा वेग कायम आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री व आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

उद्घाटनाप्रसंगी केले वक्तव्य

कोळवाडे येथे पाणीपुरवठा योजना भूमिपूजन व नवीन ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होते, तर व्यासपीठावर कॅन्सर तज्ञ डॉ जयश्री थोरात, तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे, बाळासाहेब गायकवाड , गणपतराव सांगळे, आदिवासी सेवक प्रा बाबा खरात, पंचायत समिती सदस्य काशिनाथ गोंदे, भाऊसाहेब नवले, सरपंच जयश्री कुदळ, उपसरपंच मंगेश वर्पे , मुख्याध्यापक दशरथ वर्पे , दादाभाऊ देशमुख, बाळासाहेब उंबरकर, नानासाहेब गुंजाळ, मार्केट कमिटीचे सचिव सतीश गुंजाळ, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोरोळे, गटविकास अधिकारी अनिल नागणे, सोपान वर्पे, रामदास तारडे, महादू गोंदे आदी उपस्थित होते. यावेळी सोसायटी कार्यालयाचे भूमिपूजन व कोळवाडे शेतकरी सहकारी प्रोडूस कंपनीच्या कार्यालयाचे उद्घाटनही आमदार थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.

वाडी वस्तीवर विकासाचा वेग कायम

माजी मंत्री थोरात म्हणाले, सर्वसामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारच्या माध्यमातून आपण अविश्रांत काम केले आहे. संगमनेर तालुक्याचे कार्यक्षेत्र व विस्तार मोठा आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी स्थापन केलेल्या जय हिंद आश्रम शाळेच्या माध्यमातून आदिवासी व गोरगरीब विद्यार्थी यांना गुणवत्तेचे शिक्षण मिळत आहे. गेली २७ वर्षे या संस्थेने राज्याला अनेक उच्च पदस्थ अधिकारी दिले आहेत. त्याचबरोबर या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने विविध योजना राबवल्या. याचबरोबर तालुक्याच्या वाडी वस्तीवर विकासाचा वेग कायम असल्याचे ते म्हणाले. दुष्काळी भागाला वरदान ठरणारे निळवंडेची कालवे ही अंतिम टप्प्यात आहेत.

संगमनेर तालुका ग्रामीण विकासाचे मॉडेल आमदार डॉ. तांबे म्हणाले, माजी मंत्री आमदार थोरात यांच्या सातत्यपूर्ण विकासकामांमुळे संगमनेर तालुका हा ग्रामीण विकासाचे मॉडेल ठरला आहे. गोरगरीब आणि दुर्बल घटकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम आमदार थोरात यांनी केले आहे. महिलांमध्ये आरोग्याबाबत झालेली जागृती आनंददायी डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या, ग्रामीण भागातील महिलांमध्ये उद्योजकता व आरोग्याबाबत झालेली जाणीव जागृती अत्यंत आनंददायी आहे. महिलांचे आरोग्य चांगले राहिले तर कुटुंबाचे आरोग्य चांगले राहते.

बातम्या आणखी आहेत...